लाल किल्ल्यात घुसणाऱ्यांना आतमध्ये जाऊ कुणी दिलं? राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - rahul gandhi slams bjp government over red fort violence and protest | Politics Marathi News - Sarkarnama

लाल किल्ल्यात घुसणाऱ्यांना आतमध्ये जाऊ कुणी दिलं? राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागले होते. आता या प्रकरणी सरकारकडेच बोट दाखवले जात आहे. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांपासून सुरू आहे. या आंदोलनाला दिल्लीत प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागले होते. आता या प्रकरणी सरकारकडेच संशयाची सुई वळू लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. लाल किल्यावर धुडगूस घालणाऱ्यांना न रोखण्यामागे गृहमंत्रालयाचा नेमका उद्देश काय होता, असा सवाल त्यांनी विचारला आहे. शेतकऱ्यांनी एक इंचही मागे हटू नये मी तुमच्यासोबत आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाराचारानंतर सरकार आक्रमक झाले आहे. शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमा आणि गाझीपूर येथे पोलिस कारवाईमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी कायदे आणि दिल्लीतील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती अभिभाषणावर बहिष्कार टाकला. 

सिंघू सीमेवर राडा...पोलिसांच्या समोरच शेतकऱ्यांवर दगडफेक अन् तंबूंची मोडतोड

आज पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की,  कृषी कायदे हे बाजार व्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व मिटवणारे आहेत. यामुळे देशातील तीन-चार उद्योगपती हवे तेवढे धान्य साठवून ठेवतील. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याची मुभा नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांना मारायला निघाले आहे. 

राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले अन् म्हणाले, तर मी आत्महत्या करेन...

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. आता शेतकऱ्यांवरच हल्ले करून मोदी सरकार देशालाच दुबळे बनवत आहे. पंतप्रधान हे पाच उद्योगपतींसाठी काम करीत आहेत. या उद्योगपतींसाठीच नोटाबंदी व वस्तू व सेवा करांचे (जीएसटी) निर्णय झाले आणि त्यांच्यासाठीच कृषी कायदेही आणले आहेत. शेतकऱ्यांनी एक इंचही माघार घेण्याची गरज नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. आंदोलन संपले या भ्रमात पंतप्रधान मोदींनी राहू नये आंदोलन शहरांमधून गावांपर्यंत पोचेल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे. 

नेत्याचे अश्रू पाहिले अन् उसळला हजारोंचा जनसमुदाय..!

गृहमंत्री अमित शहा यांनाही राहुल गांधींनी लक्ष्य केले. ते  म्हणाले, की लाल किल्यामध्ये ५० शेतकऱ्यांना कुणी जाऊ दिले? त्यांना रोखण्याचे गृह खात्याचे काम नाही का? यामागची नेमकी कल्पना काय होती हे गृहमंत्र्यांनी सांगावे. 

अर्थव्यवस्थेला रसातळाला कसे न्यावे हे मोदींकडून शिकावे 

राहुल यांनी ट्विटरवरूनही पंतप्रधानांवर मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शेतकरी, मजुरांवर वार करून पंतप्रधान मोदी भारताचे नुकसान करत आहेत. याचा फायदा देशविरोधी शक्तींना होईल. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला रसातळाला कसे न्यावे हे मोदी सरकारकडून शिकावे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख