सिंघू सीमेवर राडा...पोलिसांच्या समोरच शेतकऱ्यांवर दगडफेक अन् तंबूंची मोडतोड - at singhu border some persons pelted stones at farmers and vandalised tents | Politics Marathi News - Sarkarnama

सिंघू सीमेवर राडा...पोलिसांच्या समोरच शेतकऱ्यांवर दगडफेक अन् तंबूंची मोडतोड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आता शेतकरी आंदोलकांवर सरकारकडून दडपशाहीचे प्रकार सुरू झाले आहेत. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दोन महिन्यांपासून अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहेत. सिंघू सीमेवर पोलिसांच्या संरक्षणाखाली स्वत:ला स्थानिक म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गटाने आज शेतकऱ्यांवर दगडफेक केली. याचबरोबर शेतकऱ्यांच्या तंबूंची मोडतोड केली. पोलिसांच्या समोरच हा प्रकार सुरू होता मात्र, ते हस्तक्षेप करीत नसल्याचे या प्रकरणी वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर आज सिंघू सीमेवर राडा झाला. स्थानिक म्हणवून घेणारा दोनशे जणांचा जमाव शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी घुसला. त्यांनी शेतकऱ्यांवर दगडफेक करुन तंबूंची मोडतोड करण्यास सुरवात केली. या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. अखेर याला उत्तर म्हणून शेतकऱ्यांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या सर्व गदारोळात काही पोलीसही जखी  

पोलिसांनी शेतकरी आंदोलन करीत असलेला परिसर सगळ्या बाजूंनी बंद केलेला आहे. तरीही एवढा मोठा जमाव आंदोनस्थळी कसा पोचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या जमावाने पोलिसांच्या उपस्थितीतीच शेतकऱ्यांवर दगडफेक करीत तंबूंची मोडतोड केली. मात्र, पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली. यासाठी पोलिसांनी कुणाचा आदेश होते का, असा सवाल विचारण्यात येत आहे. दरम्यान, टिकरी सीमेवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेथेही अशाच प्रकारे एक जमाव शेतकऱ्यांना विरोध करण्यासाठी जमला होता. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याच्या परिसरात घुसून धार्मिक झेंडा लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन जणांविरुध्द राष्ट्रद्रोहाचा (कलम १२४ अ) गुन्हा दाखल केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अराजकता पसरविण्याच्या गुन्ह्याखाली कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून, मेधा पाटकर, दर्शन पाल, योगेंद्र यादव, राजिंदरसिंग, बुटासिंग व बलबीरसिंह राजेवाल आदी ३७ शेतकरी नेत्यांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

काहीं शेतकरी नेत्यांविरूध्द तर भारताबाहेर जाण्याची परवानगी नाकारून लुकआऊट नोटीसही (एलओसी) जारी करण्यात आली असून त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शेतकरी नेत्यांबरोबर चर्चेस सरकारने पुन्हा तयारी दाखविली तरी नोटिशी बजावलेल्या नेत्यांना चर्चेत सहभागी करून घेण्यास सरकारची तयारी नसल्याचे आज सांगण्यात आले. योगेंद्र यादव यांना चर्चेच्या परिसरात येण्यास सरकारने पहिल्यापासून विरोध केला होता व ४१ आंदोलनकर्त्या संघटनांच्या शेतकरी नेत्यांनी तो मान्य करून यादव यांना एकाही चर्चेत प्रत्यक्ष सहभागी करून घेतलेले नव्हते.

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी ट्रॅक्‍टर रॅलीला परवानगी देताना शेतकरी नेत्यांनी दिलेले लेखी आश्‍वासन पाळले नाही व त्यामुळे दिल्लीत हिंसाचार उफाळला व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, असा आरोप शेतकरी नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख