राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले अन् म्हणाले, तर मी आत्महत्या करेन... - rakesh tikait says if government did not take back farm laws back he will commit suicide | Politics Marathi News - Sarkarnama

राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले अन् म्हणाले, तर मी आत्महत्या करेन...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आता शेतकरी आंदोलकांवर सरकारकडून दडपशाहीचे प्रकार सुरू झाले आहेत. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दोन महिन्यांपासून अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहेत. सरकारकडून आता शेतकऱ्यांची दडपशाही करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे शेतकरी नेते राकेश टिकैत भावनिक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. सरकारने कृषी कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळे खाली करावीत, यासाठी सरकारने दबाव आणण्यास सुरवात केली आहे. पोलिसांच्याकडूनही शेतकऱ्यांना इशारा दिला जात आहेत. गाजीपूर सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सरकारकडून शेतकऱ्यांचा छ ळ सुरू असल्याचा आरोप केला. 

शेतकऱ्यांसमोर बोलताना टिकैत यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. शेतकऱ्यांना ठार मारण्याचा कट आखला जात आहे. सरकारने कायदे मागे न घेतल्यास मी आत्महत्या करेन. या देशातील शेतकऱ्यांनी मी वाया जाऊ देणार नाही. 

अतिशय मोठा कट रचण्यात आला आहे, मला याबद्दल माहिती नव्हते. मी सगळ्या लोकांच्या विरोधात जाऊन भाजपला मतदान केले होते. माझ्या पत्नीनेही दुसऱ्या पक्षाला मतदान केले होते. मी भाजपला मतदान करुन आपल्याच लोकांचा विश्वासघात केला. देशातील शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र या सरकारकडून सुरू आहे, असे टिकैत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याच्या परिसरात घुसून धार्मिक झेंडा लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन जणांविरुध्द राष्ट्रद्रोहाचा (कलम १२४ अ) गुन्हा दाखल केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अराजकता पसरविण्याच्या गुन्ह्याखाली कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून, मेधा पाटकर, दर्शन पाल, योगेंद्र यादव, राजिंदरसिंग, बुटासिंग व बलबीरसिंह राजेवाल आदी ३७ शेतकरी नेत्यांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

काहीं शेतकरी नेत्यांविरूध्द तर भारताबाहेर जाण्याची परवानगी नाकारून लुकआऊट नोटीसही (एलओसी) जारी करण्यात आली असून, त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शेतकरी नेत्यांबरोबर चर्चेस सरकारने पुन्हा तयारी दाखविली तरी नोटिशी दिलेल्या नेत्यांना चर्चेत सहभागी करून घेण्यास सरकारची तयारी नसल्याचे आज सांगण्यात आले. योगेंद्र यादव यांना चर्चेच्या परिसरात येण्यास सरकारने पहिल्यापासून विरोध केला होता व ४१ आंदोलनकर्त्या संघटनांच्या शेतकरी नेत्यांनी तो मान्य करून यादव यांना एकाही चर्चेत प्रत्यक्ष सहभागी करून घेतलेले नव्हते.

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी ट्रॅक्‍टर रॅलीला परवानगी देताना शेतकरी नेत्यांनी दिलेले लेखी आश्‍वासन पाळले नाही व त्यामुळे दिल्लीत हिंसाचार उफाळला व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, असा आरोप शेतकरी नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख