वाधवान चौकशी : पोलिस लोणावळ्यापर्यंत जाऊन आले; गुप्तांनी दिलेल्या पासवरचा प्रवास शोधला

इन्स्टिटयुशन क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर वाधवानांच्या मागे अनेक चौकशी पथकांचा ससेमिरा लागणार आहे. कदाचित इडी अथवा सीबीआय बॅंक घोटाळयातील चौकशीसाठी वाधवान बंधु यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
yes bank issues
yes bank issues

महाबळेश्वर (जि. सातारा) : पांचगणी येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेले येस बॅंक घोटाळयातील आरोपी प्रसिध्द उदयोगपती वाधवान बंधुची चौकशी करण्यासाठी महाबळेश्वर पोलिस निरीक्षक बी.ए.कोंडुभैरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक पथक नुकतेच लोणावळा येथुन परत आले. या प्रकरणाच्या चौकशीची एक फेरी पूर्ण झाली. दरम्यान वाधवान यांच्या चौकशीसाठी जिल्हयाबाहेरील पथकाला क्वारंटाईन कक्षात प्रवेश नाकारण्यात आल्याने या पथकाला चौकशीसाठी २३ एप्रिलची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

गृहविभागाचे सचिवांच्या पत्राचा आधार घेऊन येस बॅंक घोटाळयातील उदयोगपती वाधवानांनी बंधुंसह नोकरचाकर अशा २३ जणांसह लोणावळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. हा २०० किलोमीटरचा प्रवास करताना त्यांनी जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे प्रांताधिकारी यांनी केलेल्या फिर्यादीवरून उद्योगपती वाधवान यांच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्याने वाधवान बंधु यांच्यासह २२ जणांना पांचगणी येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयाचा तपासासाठी महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक बी.ए.कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक वाधवान बंधु हे लोणावाळयाच्या ज्या भागात राहिले त्या भागात चौकशी करून नुकतेच परत आले.

वाधवान बंधुंनी प्रवासासाठी गृहविभागाचे सचिव अमिताभ गुप्ता यांचे खास पत्र घेतले होते. तेच पत्र त्यांनी अनेक ठिकाणी दाखविले लोणावळयाच्या बाहेर पडताना आठ एप्रिलला सायंकाळी प्रथम लोणावळा पोलिसांच्या नाकेबंदीत वाधवान उदयोगपतीस अडविण्यात आले. त्या ठिकाणी प्रधान सचिव यांचे पत्र दाखविले. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी वाधवान यांच्या पाच गाडया सोडल्या.

त्यानंतर या उद्योगपतीस एक्सप्रेस हायवेच्या लोणावळयातील टोलनाक्यावर व पुण्याजवळील टोलनाक्यावर अडविण्यात आले. त्या ठिकाणीही त्यांनी हेच पत्र दाखविले. त्यानंतर खेडशिवापुर टोलनाक्यावर वाधवान यांच्या गाडया आडविण्यात आल्या. त्या ठिकाणीही वाधवान यांनी गुप्ता यांचे पत्र दाखविले. तेथुन वाधवान यांच्या गाडयांचा ताफा हा सारोळे येथे सातारा जिल्हयाच्या हद्दीवर आला. तेथे जिल्हयात प्रवेश देण्यापुर्वी पोलिसांनी चौकशी केली.

त्या ठिकाणीही पोलिसांना वाधवान यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव यांचे ते पत्र दाखविले. गुप्ता यांचे पत्र पाहताच पोलिस अधिक चौकशी न करता वाधवान यांच्या वाहनांना सोडत होते. सारोळेनंतरच्या प्रवासात वाधवान यांना फारशा अडचणी आल्या नाहीत. महाबळेश्वर पोलिस पथकाने प्रथम वाधवान यांची चौकशी केली. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी वाधवान यांच्या गाडया अडविण्यात आल्या त्या त्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी यांची चौकशी महाबळेश्वर पोलिसांनी केली.

त्यानंतर महाबळेश्वर येथील तपास पथक लोणावळया जवळील तुंगार्ली येथे पोहोचले. याच विभागातील पीकॉक व्हॅली या सोसायटीत पोहोचले. याच सोसायटीतील दोन बंगले वाधवान यांनी भाडयाने घेतले होते. हे दोन्ही बंगले मुंबईच्या एका धनिकाचे
असुन ते भाडयाने दिले जातात. यासाठी लोणावळयात एका दलालाची नेमणुक करण्यात आली आहे. याच दलालाच्या मार्फत वाधवान यांनी २० मार्च रोजी हे बंगले भाडयाने घेतले होते. 

या बंगल्यांची देखभाल करण्यासाठी धनिकाने एका केअर टेकरची नेमणुक केली असुन तो दलाल आणि हा केअरटेकर यांची चौकशी महाबळेश्वरच्या पोलिस पथकाने केली आहे. इन्स्टिटयुशन क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर वाधवानांच्या मागे अनेक चौकशी पथकांचा ससेमिरा लागणार आहे. कदाचित इडी अथवा सीबीआय बॅंक घोटाळयातील चौकशीसाठी वाधवान बंधु यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्वारंटाईन कालावधीनंतर वाधवान बंधु यांचा पुढील मुक्काम हा दिल्लीत असू शकतो, अशी चर्चा महाबळेश्वरात आहे.
     
वाधवान उदयोगपती हे २० मार्च रोजी लोणावळा जवळील तुंगार्ली येथे राहण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांची नोंद पालिका प्रशासनाने केली होती. परंतु ८ एप्रिल रोजी लोणावाळा सोडताना उदयोगपतीने पालिका प्रशासनाला काहीही माहीती दिली नसल्याचे चौकशीतुन उघडकीस आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com