रुग्ण म्हणून आला आणि कोरोनाला हरवणारा योद्धा म्हणून परतला!

'कोरोना'चा संसर्ग झालेला नाशिकचा पहिला रुग्ण आज खडखडीत बरा होऊन घरी परतला. जिल्हा शासकीय रुग्णालयात तो आला 'कोरोना'ग्रस्त म्हणून. मात्र चौदा दिवसांच्या यशस्वी उपचारातून त्याने जगाला हादरवणाऱ्या कोरोना विषाणूला पराभूत केले
Nashik's First Corona Positive Patient Dicharged from Hospital
Nashik's First Corona Positive Patient Dicharged from Hospital

नाशिक : 'कोरोना'चा संसर्ग झालेला नाशिकचा पहिला रुग्ण आज खडखडीत बरा होऊन घरी परतला. जिल्हा शासकीय रुग्णालयात तो आला 'कोरोना'ग्रस्त म्हणून. मात्र चौदा दिवसांच्या यशस्वी उपचारातून त्याने जगाला हादरवणाऱ्या कोरोना विषाणूला पराभूत केले. रुग्णालयातून तो बाहेर पडला तेव्हा रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वॉर्ड ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मानवी साखळी केली. 'कोरोना'ला पराभूत केलेला 'तो' अगदी योद्धयाच्या थाटात बाहेर पडला.

त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी सर्व डॉक्‍टर्स, परिचारीका, कर्मचाऱ्यांनी वॉर्डपासून मुख्य गेटपर्यंत मानवी साखळी करीत त्यांच्या रुग्णवाहिकेला टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा गेल्या 25 मार्चला जिल्ह्यातील पहिला रुग्ण पिंपळगाव नजीक (लासलगाव) येथील 35 वर्षीय तरुण निष्पन्न झाला. त्या वेळी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा हादरली. जिल्हा रुग्णालयात 14 दिवसांच्या उपचारानंतर हा तरुण जिल्ह्यातील पहिला कोरोनामुक्त रुग्ण ठरला. 

डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिला मानसिक आधार 

जिल्हा रुग्णालयाचे डॉक्‍टर आणि त्यांच्या टीमने दिलेल्या मानसिक आधारामुळेच या जीवघेण्या कोरोनावर मात करणे शक्‍य झाले. माझ्यासाठी तेच परमेश्‍वरच असल्याची भावना या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने व्यक्त केली.  या तरुणाला 20 मार्चच्या दरम्यान थंडी-ताप आला. लक्षणे पाहता त्याला 25 मार्चला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. 27 मार्चला तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. हे जेव्हा त्यास सांगितले, तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यासमोर अंधारीच आली.

१४ दिवसांत एकही इंजेक्शन नाही

विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार झाले. फिजिशियन डॉ. प्रमोद गुंजाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख डॉ. अनंत पवार यांच्यासह नर्स, कक्षेतील स्टाफने त्यास मानसिक आधार दिला. त्यामुळे त्यानेही डॉक्‍टरांच्या उपचाराला तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी कोरोनासारख्या विषाणूवर मात करण्यात तो व डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचारी यशस्वी झाले. त्याला क्वारंटाइनच्या 14 दिवसांत एकदाही इंजेक्‍शन वा सलाइन घेण्याची वेळ आली नाही.

डाॅक्टर व त्यांची टीम हेच माझे परमेश्वर

कोरोनाची लागण झाल्याने डोके बधीर झाले. मात्र, त्या वेळी डॉ. जगदाळे, डॉ. पवार, डॉ. गुंजाळ, कक्षातील नर्स यांनी मानसिक आधार दिला. डॉ. पवार नेहमी माझ्याशी फोनवर बोलायचे. त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यांचे आभार. वैद्यकीय उपचार करणारेच माझ्यासाठी परमेश्‍वर आहेत. - पहिला कोरोनामुक्त रुग्ण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com