शिवसेनेची टीका हजारेंना जिव्हारी, आता उघडतील का `त्या` नेत्यांच्या पोथ्या? - Anna Hasaje updates news, Warning to Shiv Sena leaders | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेची टीका हजारेंना जिव्हारी, आता उघडतील का `त्या` नेत्यांच्या पोथ्या?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

आता आपल्याकडे अनेक नेत्यांच्या पोथ्या आहेत, त्या उघडल्या तर धक्का बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोणकोणत्या नेत्यांच्या गैरव्यवहाराच्या पोथ्या हजारे यांच्याकडे आहेत.

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शिवसेनेची टीका चांगलीच जिव्हारी लागली आहे. आंदोलन मागे घेतल्याने शिवसेनेने टीका केली होती. त्याबाबत हजारे यांनी संबंधित नेत्यांची प्रकरणे आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. आता आपल्याकडे अनेक नेत्यांच्या पोथ्या आहेत, त्या उघडल्या तर धक्का बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोणकोणत्या नेत्यांच्या गैरव्यवहाराच्या पोथ्या हजारे यांच्याकडे आहेत, याबाबत चर्चा झडू लागल्या आहेत.

याबाबत माध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले, "मी कोणाविरोधात उगीच आंदोलन करीत नाही. कोणताही पक्ष किंवा व्यक्ती नव्हे, तर मी समाजहितासाठीच आंदोलने केली आहेत. आंदोलन मागे घेतल्याने माझ्यावर झालेली टीका नवीन नाही. अनेक राजकारणी नेत्यांच्या पोथ्या माझ्याकडे आहेत, त्या उघडल्या अनेकांना मोठा धक्का बसेल. त्यामुळे माझ्यावर निष्कारण आरोप करू नयेत.''

हेही वाचा... बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री करायचंय

हजारे म्हणाले, "" शेतकऱ्यांना झाडे, खड्डे खोदणे, खते, तसेच इतर मशागतीसाठी अनुदान, मजुरीसुद्धा सरकारकडून मिळते. त्याच धर्तीवर देशभरातील दुष्काळग्रस्त, जिरायती भागातील शेतकऱ्यांना सरकारने शेतीची मशागत, पीकपेरणी वा लागवडीसाठी, पिकांची काढणी वा तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून शेतमजूर किंवा मजुरी देऊन मदत करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास, सरकारला हमीभाव ठरविणे सोपे जाईल. कारण, त्यामुळे जिरायती वा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च आपोआप कमी होईल व जो हमीभाव जाहीर होईल, तो त्यांना आपोआप परवडेल.'' 

हेही वाचा... तुमच्याच खात्याचे कर्मचारी हलगर्जीपणा करतात

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन खर्च कमी होईल. त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत. कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मोठी मदत होणार आहे, असे हजारे म्हणाले.

हेही वाचा.. पंकुताई-धनुभाऊची गळाभेट  

दरम्यान, या पूर्वी हजारे यांनी अनेक नेत्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. गैरव्यवहाराची प्रकरणे समाजासमोर मांडून अनेक नेत्यांना हतबल केले आहे. असे असताना शिवसेनेने त्यांच्यावर टीका करून नसता रोष अंगावर ओढून घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात हजारे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा विषय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर गाजत आहे. हजारे यांनी एकदा इशारा दिल्यानंतर त्या दृष्टीने ते संबंधितांच्या फाईली समाजसमोर ठेवत असतात. त्यामुळे आता सत्तेत असणारे शिवसेनेचे नेते हजारे यांच्याकडून होणाऱ्या आरोपांना कशापद्धतीने तोंड देतात, हे काळच ठरवणार आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख