पंकुताई - धनुभाऊची गळाभेट होईल का पुन्हापुन्हा ! परळीच्या `आई`ला फुटेल का पान्हा

पंकजा व धनंजय या दोघांतच सत्तेसाठी स्पर्धा लागली. आणि बीड जिल्ह्यावर वर्चस्वासाठी दोघेही आडून बसले.
pankaja and dhanajnay galabhet.jpg
pankaja and dhanajnay galabhet.jpg

नगर : `परळी माझी आई, तर पाथर्डी मावशी` आईइतकेच प्रेम मावशीही देते, एव्हाना जास्त, असं स्व. गोपीनाथ मुंडे कायम म्हणायचे. आईइतकेच प्रेम मावशीवरही करायचे. बीड जिल्ह्यातील परळी आणि नगर जिल्ह्यातील पाथर्डी हे दोन्हीही मतदारसंघ ऊसतोड कामगारांचे माहेरघर. अशा कामगारांच्या प्रश्नांसाठी मुंडेंनी जीवाचे रान केले. तोच कित्ता त्यांची मुलगी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गिरविला.

बीड जिल्ह्यावर मुंडे कुटुंबाचा एकहाती अंमल असताना पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ मंत्री धनंजय मुंडे यांचेही राजकारणात करिअर झाले. पंकजा व धनंजय या दोघांतच सत्तेसाठी स्पर्धा लागली. आणि बीड जिल्ह्यावर वर्चस्वासाठी दोघेही आडून बसले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांना पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी त्यांनी मंत्रीपदांवर असताना अनेक कामे केली. भाजपची बुलंद तोफ, स्टार प्रचारक म्हणून पंकजाकडे पाहिले जाते. केवळ बिड जिल्ह्यानेच नव्हे, तर नगर जिल्ह्याने, पाथर्डी तालुक्यानेही पंकजांना तितकेच प्रेम दिले. पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी तर स्वतःच्या विजयाचा उत्सव केलाच नाही. पंकजा यांचा पराभव त्यांना जिव्हारी लागल्या. त्यांनी लगेचच परळी गाठली.

`आई`साठी `मावशी` पद सोडण्यास तयार

`आई`ला पदावर घेण्यासाठी `मावशी` पद सोडण्यास तयार आहे, अशी राजळे यांनी हाक दिली. मी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा देते, तेथून तुम्ही निवडणूक लढवा. आम्ही विजयी करू, असे आमदार राजळे यांनी पंकजा यांना सांगून आई-मावशीचे प्रेम अद्यापही टिकून आहे, हे सिद्ध करून दिले.

इकडे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपले कर्तुत्त्व सिद्ध केले. सामाजिक न्यायमंत्रीपद मिळवून बीडवर आपलीच सत्ता असल्याचे दाखवून दिले. पंकजाला हार मानावी लागली. भाऊ-बहिणीमधील नात्यातील दरी वाढतच गेली.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघावर कुणाची सत्ता, हीच चर्चा राज्यभर होती. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यात पंकजाने बाजी मारली. धनंजय मुंडे यांना हा पराभव जिव्हारी लागला. 2015 मध्ये चिक्की घोटाळ्यात पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय यांनी आगपाखड केली. 206 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप पंकजांवर झाला. हा आरोप पंकजा यांना जिव्हारी लागला. भाऊ-बहिणी वैरी झाले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत हा विरोध अधिक कडवा झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी केला. तेव्हा महाराष्ट्रात त्याची जोरदार चर्चा झाली. तब्बल 28 हजार 116 मतांनी धनंजय यांनी विजयश्री खेचून आणली. त्यानंतर हे विरोधक भविष्यात कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत, असेच चित्र निर्माण झाले. त्याचे प्रत्यंतर आजही येत आहे.

भाऊ-बहिणीची गळाभेट

2018 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या भावा-बहिणीने चक्क गळाभेट घेतली. हा धक्का अनेकांनी अनुभवला. विशेष म्हणजे खासगीत गप्पा मारताना ते अजूनही पंकुताई व धनुभाऊ असाच उल्लेख करतात. 

एकमेकांना `चिमटे` काढलेच

काल गहिनीनाथ गडावर झालेल्या एका कार्यक्रमात दोघेही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले. दोघांमध्येही अबोला राहिला. मात्र भाषणातून एकमेकांंना चिमटे काढायचे ते विसरले नाहीत. आता बीड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी मीच घेतली असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले, तर तुम्ही करीत असलेल्या विकासकामांना आमच्या शुभेच्या असे सांगून पंकजा यांनीही त्यांना उपोरधात्मक शुभेच्छा दिल्या. आगामी काळात 2018 ची पुनरावृत्ती होईल का, त्यांची गळाभेट होऊ शकेल का, असाच प्रश्न अऩेकांना पडला. राजकारणात काहीही घडते, त्यामुळे लोकांच्या मनातील सुप्त इच्छा प्रत्यक्षात उतरल्यास नवल वाटायला नको. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com