तुमच्याच खात्याचे कर्मचारी हलगर्जीपणा करतात, या मंत्र्यांना सुनावले शेतकऱ्यांनी - prajakt tanpure news, jantadarbar jeur | Politics Marathi News - Sarkarnama

तुमच्याच खात्याचे कर्मचारी हलगर्जीपणा करतात, या मंत्र्यांना सुनावले शेतकऱ्यांनी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

या दरबारात सर्वाधिक तक्रारी वीजप्रश्नाच्याच होत्या. संबंधित अधिकारी कामात हालगर्जीपणा करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

नगर : ऊर्जामंत्री तथा नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर व पाथर्डी तालुक्यात जनता दरबार भरवून ग्रामस्थांच्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न केला. या दरबारात सर्वाधिक तक्रारी वीजप्रश्नाच्याच होत्या. संबंधित अधिकारी कामात हालगर्जीपणा करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

हेही वाचा... पंकुताई- धनुभाऊची गळाभेट होईल का पुन्हापुन्हा !

तालुक्‍यातील जेऊर येथे आज नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा जनता दरबार झाला. त्यात नागरिकांनी विविध समस्या मांडल्या असल्या, तरी सर्वाधिक समस्या महावितरणच्याच असल्याचे दिसून आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून समस्या सोडविण्यात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. 

वाघवाडी येथील स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न, चापेवाडी परिसरात नवीन रोहित्र, लिगाडे वस्ती ते इमामपूर शिव रस्त्याचे काम, पिंपळगाव तलावातील आदिवासी भिल्ल समाजाला जातीचे दाखले व इतर सुविधा मिळाव्यात. जेऊरसाठी मराठी शाळेजवळ नवीन पाण्याची टाकी मिळावी, आदी मागण्या नागरिकांनी केल्या. 

हेही वाचा... तहसीलसमोर केली चूल अन थापल्या धपाधपा भाकरी

मंत्री तनपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ फोन करीत समस्या सोडविल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दर शनिवारी जेऊर येथे आठवडेबाजार असतो. जागेअभावी मुख्य रस्त्यावरच बाजार भरत असल्याने तनपुरे यांनाच बाजारातून पायी चालत जनता दरबाराच्या ठिकाणापर्यंत पोचावे लागले. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, सहायक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, मंडळाधिकारी वृषाली करोसिया आदी उपस्थित होते. 

 

हेही वाचा..

विविध संघटनांतर्फे शेवगावात "चक्‍का जाम' आंदोलन 

शेवगाव : नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात केंद्र सरकार दडपशाही करीत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती मंच व शेतकरी संघटनेतर्फे शहरातील क्रांती चौकात शनिवारी (ता.6) "रास्ता रोको' करून देशव्यापी "चक्का जाम' आंदोलन करण्यात आले.

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सोडून दिले. भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे म्हणाले, "दिल्लीतील शेतकरी आंदोलनात केंद्र सरकार दडपशाही करीत असून, आम्ही त्याचा धिक्कार करतो. केंद्राच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व तीन कृषी कायदे रद्द करून शेतीमालास हमी भावाचा कायदा मंजूर करून घेण्यासाठी हे आंदोलन आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रद्द करावी, अशीही मागणी करण्यात आली. ज्येष्ठ नेते शशिकांत कुलकर्णी, कृष्णनाथ पवार, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशीनकर, प्रा. शिवाजी देवढे, वैभव शिंदे, संदीप इथापे, भगवान गायकवाड, कारभारी वीर, शंकर देवढे, मुरलीधर काळे आदी उपस्थित होते. 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख