महापालिका निवडणूक इच्छुकांच्या सहनशिलतेची आता परीक्षा- इम्तियाज जलील

कोरोनाचा धोका लक्षात घेता आता निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. खऱ्या अर्थाने हा काळ म्हणजे इच्छुकांच्या सहनशिलतेची परीक्षा पाहणारा असणार आहे- इम्तियाज जलील, खासदार
औरंगाबाद महापालिका निवडणुकीबाबत बोलताना खासदार इम्तियाज जलील
औरंगाबाद महापालिका निवडणुकीबाबत बोलताना खासदार इम्तियाज जलील

औरंगाबादः निवडणुका लढवून नगसेवक होण्याची पद मिळवण्याची इच्छा अनेकजण बाळगून असतात. ते कशासाठी तर समाजसेवा करायची, जनतेची कामे करायची म्हणून असे उत्तर सगळेच देत असतात. महापालिका निवडणुकीच्या माध्यामातून अनेक इच्छूक समाजसेवेसाठी पुढे सरसावले आहेत. एमआयएमच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये इच्छूकांच्या उड्या पडल्या आहेत. 

कोरोनाचा धोका लक्षात घेता आता निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. खऱ्या अर्थाने हा काळ म्हणजे इच्छुकांच्या सहनशिलतेची परीक्षा पाहणारा असणार आहे अशा शब्दांत एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी इच्छुकांना चिमटा काढला आहे.

महापालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छूकांची गर्दी जशी सत्ताधारी शिवसेना-भाजपकडे होती तशी ती एमआयएमकडेही होती. हजारो इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दाखल करत समासेवा करण्याची संधी देण्याची मागणी करत तयारी केली होती. निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्यामुळे आता त्या तयारीचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या संदर्भात सरकारनामाशी बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, राजकारणात अनेकजण मला समाजसेवा करायची असे म्हणत दाखल होतात. पण एखादे पद किंवा अधिकार असतील तरच समाजसेवा होऊ शकते असा समज झाल्यामुळेच महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या हजारोंवर पोहचली आहे. पण कोरोनाबाधित व संशयित रुग्णाची राज्यातील संख्या पाहता खबरादारीचा उपाय म्हणून महापालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूकांना स्थगिती देण्यात आली आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे लोकप्रतिनीधी आणि सरकार म्हणून आमचे कर्तव्यच आहे आणि त्यातून हा निर्णय घेण्यात आला. 

शेवटी निवडणुकांपेक्षा लोकांचे प्राण महत्वाचे आहेत हे समजून घेतले पाहिजे. राहिला प्रश्न निवडणूक तयारीचा तर आमच्या पक्षाची शहरातील ताकद, महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांवर ठेवलेला अंकुश, आमच्या नगरसेवकांनी त्यांच्या वार्डात केलेली विकासकामे आम्हाला माहित आहेत. त्यामुळे निवडणुका उद्या झाल्या काय? किंवा सहा महिन्यांनी झाल्या काय? आम्ही त्यासाठी तयार आहोत.

राज ठाकरेंनी सगळ्यांना वेड्यात काढले होते
कोरोनाचा धोका आणि रुग्ण जगभरात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या देशात, राज्यात देखील योग्य ती काळजी घेणे गरजेजे आहे. घाबरण्याची गरज नसली तरी या आजाराकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते हे आता स्पष्ट होत आहे. काही दिवसांपुर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादेत आले होते, तेव्हा त्यांनी कोरोनाची सरकारकडून भिती दाखवली जात असल्याचे विधान केले होते.

आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आहे, त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही असे म्हणत त्यांनी सगळ्यांनाच वेड्यात काढले होते. आता मात्र निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे त्यांचा पक्षाने देखील स्वागत केले आहे असे सांगत इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंनाही टोला लगावला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com