तिबेटी धर्मगुरू दलाई लामांनी घेतली कोरोनाची लस अन् म्हणाले...

देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे.
tibetan spiritual leader dalai lama takes covid 19 vaccine jab
tibetan spiritual leader dalai lama takes covid 19 vaccine jab

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. आता तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. दलाई लामांनी हिमाचल प्रदेशातील लसीकरण केंद्रावर लस टोचून घेतली आहे.  

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामांनी आज कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. त्यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील झोनल हॉस्पिटलमध्ये कोरोना लस घेतली. या लशीबद्दल दलाई लामांच्या कार्यालयाने भारत सरकार आणि हिमाचल प्रदेशचे आभार मानले आहेत. दलाई लामा लस घेतानाचा व्हिडीओही यूट्यूबवर टाकण्यात आला आहे. 

लस घेतल्यानंतर दलाई लामा म्हणाले की, माझे विश्वासू मित्र आणि डॉक्टरांनी मला कोरोना लस घेण्याचा सल्ला दिला होता. काही गंभीर समस्या निर्माण होण्याआधी त्यांना प्रतिबंध करण्यासाठी ही लस अतिशय उपयोगी आहे. यामुळे इतर नागरिकांनी आरोग्यविषयक फायद्यासाठी कोरोनाची लस घ्यावी आणि हे अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाने ही लस घेण्याचे धैर्य दाखवायला हवे.  

देशभरात आतापर्यंत 1.94 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह केस 90 हजार 55 आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 21 लाखांहून अधिक आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com