शरद पवारांचा महाविकास आघाडीचा प्रयोग उत्तर प्रदेशातही?

भाजपच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर विखुरलेले विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. यातून आगामी राजकीय चित्र वेगळे दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
sharad pawar mahavikas aghadi experiment will be replicated uttar pradesh
sharad pawar mahavikas aghadi experiment will be replicated uttar pradesh

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या घरी नुकत्याच आयोजित मेजवानीला 15 विरोधी पक्षांचे सुमारे 45 नेते एकत्र आले होते. या बैठकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा (MVA Government) आवर्जून उल्लेख करण्यात आला. उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्वाखाली हा प्रयोग आगामी काळात राबवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. पवारांनी राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची मोट बांधली होती. यात कधीही एकत्र न येणारे काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांनी सोबत घेतले होते. त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन पक्षांना एकत्र येऊन यशस्वीपणे सरकार स्थापन केले. सुरवातीला हे सरकार कितपत टिकेल, अशी शंका उपस्थित होती. आता हे सरकार लवरकच दोन वर्षे पूर्ण करेल. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे तर विरोधी पक्षांनी अशा प्रकारे एकत्र यायला हवे, असा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात भाजप सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल नाराजी आहे. कोरोना संकटाची अपयशी हाताळणी हे यामागील कारण आहे. यामुळे विरोधी पक्षांची एकजूट झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव शक्य आहे. हाच धागा पकडून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला. शरद पवारांनी राबवलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रयोगाची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात करता येईल, अशी भूमिका अनेक नेत्यांनी मांडली, असे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : गुजराल यांच्या पावलावर चार दशकांनी सिब्बल यांनी टाकलं पाऊल 

या बैठकीत भाजप जिथे मजबूत असेल तिथे विरोधी पक्षांनी लोकसभेसाठी एकच उमेदवार द्यावा, असाही प्रस्ताव समोर आला. भाजपची स्थिती ज्या राज्यांमध्ये भक्कम आहे तिथे विरोधी पक्षांनी एकाच उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी सूचना काही नेत्यांनी केली. काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी आधीही ही योजना मांडली होती. परंतु, काँग्रेस पक्ष नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. 

हेही वाचा : सिब्बल यांच्या डिनर डिप्लोमसीतून 'जी-23'चे शक्तिप्रदर्शन अन् गांधी परिवाराला इशारा

सिब्बल यांच्या घरी आयोजित मेजवानीला काँग्रेसच्या जी-23 मधील गुलाम नबी आझाद, शशी थरूर, भूपेंद्रसिंह हूडा, आनंद शर्मा, मनिश तिवारी आणि पी.चिदंबरम आदी नेते उपस्थित होते. या वेळी विरोधी पक्षांतील शरद पवार यांच्यासह शिवसेनेचे संजय राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी.राजा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, द्रमुकेचे तिरूची सिवा, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, अकाली दलाचे नरेश गुजराल, 'आप'चे संजय सिंह, बिजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा, तेलगू देसम पक्ष, वायएसआर काँग्रेसचे नेते उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com