सिब्बल यांच्या 'डिनर डिप्लोमसी'तून 'जी-23'चे शक्तिप्रदर्शन अन् गांधी परिवाराला आव्हान

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्या घरी आयोजित मेजवानीला 15 विरोधी पक्षांचे सुमारे 45 नेते एकत्र आले होते.
g23 leaders show strength in kapil sibal dinner diplomacy
g23 leaders show strength in kapil sibal dinner diplomacy

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या घरी नुकत्याच आयोजित मेजवानीला 15 विरोधी पक्षांचे सुमारे 45 नेते एकत्र आले होते. या वेळी सिब्बल यांच्यासह जी-23 मधील नेत्यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणून शक्तिप्रदर्शन केले. यातून त्यांनी गांधी परिवारालाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे. 

सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सिब्बल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नाराजीचे पत्र लिहिलेल्या 23 नेत्यांपैकी एक आहेत. यातील सर्व नेते या मेजवानीला उपस्थित होते.  या नेत्यांकडून काँग्रेस नेतृत्वाबाबत नेहमी वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता वाढदिवसाच्या मेजवानीतच पक्षाच्या नेतृत्वावर विरोधी पक्षातील नेत्यांनीही चर्चा केली आहे. काँग्रेसच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आणि काँग्रेसला सक्षम अध्यक्ष मिळणे हे दोन महत्वाचे मुद्दे या बैठकीच्या अजेंड्यावर राहिले. 

काँग्रेसच्या जी-23 मधील गुलाम नबी आझाद, शशी थरूर, भूपेंद्रसिंह हूडा, आनंद शर्मा, मनिश तिवारी आणि पी.चिदंबरम आदी नेते उपस्थित होते. या वेळी विरोधी पक्षांतील शरद पवार व संजय राऊत यांच्यासह राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, डीएमकेचे तिरूची सिवा, आरएलडीचे जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, अकाली दलाचे नरेश गुजराल आदी नेते उपस्थित होते.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिब्बल यांच्या घरी आयोजित मेजवानीतून जी-23 नेत्यांनी एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. सर्व विरोधी पक्षांना या नेत्यांनी एक प्रकारे गांधी परिवारालाच आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात बदलाची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. भाजपचा सामना करायचा असेल तर काँग्रेसचे नेतृत्व करणारा नेताही तगडा हवा, असाही सूर व्यक्त करण्यात आला. काँग्रेसमधील नेतृत्वाच्या पोकळीचा मुद्दा अनेक विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. काँग्रेसला आमचा पाठिंबा हवा असेल तर सक्षम नेतृत्व पक्षाकडे हवे, असे विरोधी पक्ष नेत्यांनी सुनावले.

सिब्बल यांनी या बैठकीत सुरूवात करताना भाजपवर हल्ला चढवला. भाजपकडून संस्था संपवून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. उमर अब्दुल्ला यांनी जेव्हा जेव्हा काँग्रेस मजबूत होते तेव्हा विरोधकही मजबूत बनतात, असा मुद्दा उपस्थित केला. पक्ष बळकट करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

काही विरोधी पक्षनेत्यांनी थेट गांधी नावाचा उल्लेख करून शरसंधान साधले. गांधी कुटुंबाच्या हातातून बाहेर आल्याशिवाय काँग्रेस पक्ष मजबूत होणे खूप कठीण असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी यापूर्वी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी नेतृत्वात बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. अनेक नेत्यांकडून राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com