मोदी सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेलने नोंदवला ऐतिहासिक विक्रम! जाणून घ्या नेमका काय... - petrol goes all time high after prices increased by petroleum companies | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

मोदी सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेलने नोंदवला ऐतिहासिक विक्रम! जाणून घ्या नेमका काय...

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी दरवाढीचा भडका उडाला आहे. आता पेट्रोल आणि डिझेलने विक्रमी कामगिरी केली आहे.

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना इंधन दरवाढ सुरूच आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने ऐतिहासिक विक्रमी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिजे तेलाच्या भाव कमी असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर गेले आहेत. 

अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या महिन्यांत सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. त्यानंतर दोन दिवस कोणतीही दरवाढ झाली नव्हती. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 35 पैसै वाढ झाली असून, दिल्लीत पेट्रोल 90.93 रुपयांवर गेले आहे. हा दिल्लीतील आतापर्यंतचा पेट्रोलचा सर्वाधिक दर आहे. याचवेळी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.34 रुपयांवर पोचला आहे. डिझेलचा दर दिल्लीत प्रतिलिटर 81.32 रुपये आणि मुंबईत 88.44 रुपयांवर गेला आहे. 

हेही वाचा : देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचा भडका..'यही है अच्छे दिन'?

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 66 डॉलरवर गेला आहे. गेल्या वर्षी एप्रिल/मे महिन्यात खनिज तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन दशकांतील नीचांकी पातळी गाठली होती. त्यावेळी मोदी सरकारने महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. पेट्रोलवर केंद्र व राज्याचा 60 टक्के आणि डिझेलवर 54 टक्के कर आहे. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढले आहेत. या भाववाढीचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. मात्र, सरकारने वाढवलेले कर कमी केलेले नाहीत. 

केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलमागे ३२.९ रुपये एवढा कर आकारत आहे. महाराष्ट्र सरकार २६.७८ रुपये कर आकारत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत केंद्र अथवा राज्य सरकार महसुलावर पाणी सोडण्यास तयार नाही. यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होताना दिसत नाहीत. 

हेही वाचा : पेट्रोल उच्चांकी पातळीवर पोचलं अन् भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, फार काही वाढ नाही..!

आयात केलेल्या खनिज तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल-डिझेलचे उत्पादन होते. त्यानंतर प्रक्रिया, वाहतुकीचा तसेच, पणन खर्च आणि नफा असे मिळून सुमारे ३.७५ रुपये प्रतिलिटर होतात. त्यानंतर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क लागू होते. त्यामध्ये प्रतिलिटर मूलभूत उत्पादन शुल्क १.४ रुपये, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क ११ रुपये आणि कृषी संरचना व विकास उपकर २.५ रुपये आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क १८ रुपये असे मिळून ३२.९ रुपयांचे विविध कर केंद्र सरकारकडून आकारले जातात. महाराष्ट्र सरकार त्यावर २५ टक्के व्हॅट म्हणजेच १६.६६ रुपये आणि १०.१२ रुपये अतिरिक्त कर लावतो. त्यानंतर पेट्रोलचे दर ठरले जातात. याचप्रमाणे डिझेलचे दरसुद्धा ठरवण्यात येतात. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख