पेट्रोल उच्चांकी पातळीवर पोचलं अन् भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, फार काही वाढ नाही..! - haryana chief minister defends rise in petrol and diesel prices | Politics Marathi News - Sarkarnama

पेट्रोल उच्चांकी पातळीवर पोचलं अन् भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, फार काही वाढ नाही..!

वृत्तसंस्था
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

देशभरातील जनता इंधन दरवाढीने त्रस्त झाली आहे. आता भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनी ही फार मोठी वाढ नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पोचले असताना हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मात्र, ही वाढ फार मोठी वाटत नाही.  

अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. त्यानंतर रविवारी (ता.21) आणि सोमवारी (ता.22) इंधन दरात वाढ झालेली नाही. इंधन दरवाढीवरुन भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधक लक्ष्य करीत आहेत. यातून दिलासा देणारे कोणतेही पाऊल अद्याप केंद्र सरकारने उचललेले नाही. 

हेही वाचा : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी झटकले हात 

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री खट्टर यांना विचारले असता ते म्हणाले की, इंधनाच्या दरात मागील 4 ते 5 वर्षांत सुमारे 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ काही फार मोठी नाही. असे असले तरी सरकार यावर नजर ठेवून आहे. इंधनावरील करातून सरकारला मिळणार महसूल पुन्हा जनतेपर्यंत पोचतो. सरकार कररुपाने जमा होणारा पैसा पुन्हा जनतेसाठीच वापरत आहे. याचबरोबर मूल्यवर्धित कर इतर राज्यांच्या तुलनेत हरियानात कमी आहे. 

हेही वाचा : निर्मला सीतारामन म्हणतात, हे तर महाभयंकर धर्मसंकट...

तेल कंपन्याच खनिज तेलाची आयात करतात. त्याच त्याचे शुद्धिकरण करुन वितरीत करतात आणि त्याच त्याची किंमत ठरवतात. तेल उत्पादक देशांनी आगामी काळात तेल उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे पुढील काळात पेट्रोलच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

हेही वाचा : देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचा भडका..यही है अच्छे दिन? 

केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलमागे ३२.९0 रुपये एवढा कर आकारत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत केंद्र अथवा राज्य सरकार महसुलावर पाणी सोडण्यास तयार नाही. सलग बारा दिवस इंधन दरांत वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ९७ रुपयांवर पोचले होते. तसेच, डिझेल ८८.६ रुपये प्रतिलिटरवर पोचले होते. आज दरात कोणताही बदल झाली नाही. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख