तिसऱ्यांदाही मुख्यमंत्रीपद हुकलं अन् नितीन पटेलांनी फिरवली पाठ

नितीन पटेल हे विजय रुपानी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते.
तिसऱ्यांदाही मुख्यमंत्रीपद हुकलं अन् नितीन पटेलांनी फिरवली पाठ
Nitin Patel has lost his chance to become the CM for third time

गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नितीन पटेल (Nitin Patel) हे प्रमुख नाव होतं. दोनवेळा मुख्यमंत्री पदानं त्यांना हुलकावणी दिल्यानं पक्षनेतृत्व यावेळी त्यांना संधी देईल, अशी जोरदार चर्चा होती. पण यावेळीही नितीन पटेल यांच्याऐवजी तुलनेने नवख्या भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांना पसंती देण्यात आली आहे. (Nitin Patel has lost his chance to become the CM for third time)

नितीन पटेल हे काळजीवाहू मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. ते 66 वर्षांचे असल्यानं त्यांना मुख्यमंत्री होण्याची ही अखेरची संधी असल्याचं बोललं जात होतं. 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा नितीन पटेल मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले होते. पण त्यावेळी रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यावेळी पटेल यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. 

त्यानंतर वर्षभरातच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजपला बहुमत मिळाल्यानंतर नितीन पटेल यांची मुख्यमंत्री पदाची आस लागली. पण यावेळीही रुपानी यांनी बाजी मारली. पटेल यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं. यावेळी मात्र त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बंडाचं निशाणा फडकवण्याचा जणू इशाराच दिला होता. पण पक्ष नेतृत्वानं त्यांची नाराजी दूर केली. 

रुपानी यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर पटेल यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. रविवारी आमदारांच्या बैठकीला जाण्यापूर्वी त्यांनी तसे संकेतही दिले होते. 'लोकप्रिय, अनुभवी आणि सर्वांना मान्य असणारा नेता मुख्यमंत्री हवा', असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण लोकप्रिय अन् अनुभव नसलेल्या भूपेंद्र पटेल यांच्या नावावर बैठकीत एकमत झालं. नितीन पटेल यांचा तिसऱ्यांदा भ्रमनिरास झाला.

राज्यपालांच्या भेटीकडं फिरवली पाठ

भूपेंद्र पटेल यांचं नाव जाहीर केल्यानंतर त्यांच्यास रुपानी, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, मनसुख मांडविया, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भूपेंद्र यादव असे सर्वच प्रमुख नेते व मंत्री राजभवनमध्ये राज्यपालांच्या भेटीला गेले. पण नितीन पटेल त्यांच्यामध्ये कुठेच दिसले नाहीत. आमदारांच्या बैठकीनंतर ते थेट आपला मतदारसंघ असलेल्या मेहसाणाकडे रवाना झाल्याची चर्चा होती. त्यामुळे पटेल हे नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत. 

सोमवारी शपथविधी

भूपेंद्र यादव सोमवारी दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पण यावेळी ते एकटेच शपथ घेणार असून एकाही मंत्र्याची शपथ होणार नाही. मंत्र्यांच्या नावांबाबत लवकरच घोषणा केली जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in