ठाकरे सरकारला संकटात टाकणारे परमबीर सिंग नेमके आहेत कुठे? - Mumbai Ex Police Commissioner Parambir Singh on two months leave | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

ठाकरे सरकारला संकटात टाकणारे परमबीर सिंग नेमके आहेत कुठे?

वृत्तसंस्था
सोमवार, 28 जून 2021

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहित अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर लेटरबॅाम्ब टाकत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांमुळं देशमुखांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. ईडीनंही या प्रकरणात एंट्री करत देशमुख यांच्याभोवतीचा फास आवळला. राज्यात 'ईडी' अॅक्शन मोडमध्ये असताना परमबीर सिंग मात्र तब्बल दोन महिन्यांच्या सुट्टीवर गेल्याचे समजते. (Mumbai Ex Police Commissioner Parambir Singh on two months leave) 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणातील तपासात त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी लगेच मुख्यमंत्र्याना पत्र लिहित देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप केले. या आरोपांनंतर राज्याच्या राजकारण मोठं वादळ उठलं. विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला नाकीनऊ आणलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक-एक कागदपत्रे सादर करत ठाकरे सरकारला संकटात टाकलं. या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर अखेर देशमुखांना राजीनामा द्यावा लागला.

हेही वाचा : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पक्षपाती, त्यांना हटवा; आमदाराची सरन्यायाधीशांकडे तक्रार

परमबीर सिंग यांनी मार्च महिन्याच्या मध्यात हा लेटरबॅाम्ब टाकला होता. तेव्हापासून आजपर्यंत राज्याचे राजकारण या प्रकरणाभोवतीच फिरत आहे. या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालय (ED) अॅक्शन मोडवर आले असून अनिल देशमुख यांच्या दोन पीएंना अटक केली आहे. तसेच उद्या देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावलं आहे. राज्यात एवढ्या घडामोडी घडत असताना परमबीर सिंग मात्र, महाराष्ट्राबाहेर असल्याचं समोर आलं आहे. 

परमबीर सिंग हे ५ मे पासून सुट्टीवर गेल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्याकडे गृहरक्षक दलाचे महासंचालक पद असून त्यांनी के. व्यंकटेशम यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवला आहे. परमबीर सिंग तब्बल दोन महिन्यांच्या सुट्टीवर गेले आहेत. सध्या ते चंदीगड येथे असल्याची सूत्रांची माहिती आहे. चंदीगडमधील एका स्थानिक रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर यांची तब्येत ठीक नसल्याचे समजते.

परमबीर सिंग हेही अडचणीत 

परमबीर सिंग यांच्यावर अकोल्यातील पोलिस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे. या गुन्हा अटक होण्याची भिती त्यांना आहे. उच्च न्यायालयाने त्यांना सध्या अटकेपासून काही दिवसांचे संरक्षण दिले असले तरी येत्या काळात त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडूनही काही प्रकरणात त्यांची चौकशी केली जात आहे. 

हेही वाचा : पतीनं सहा महिन्यांच्या बाळासह हाकलून दिलं अन् ती सरबत विकून झाली पीएसआय

परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात राज्य सरकार आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोपही केला आहे. आपल्याविरोधात सुरू असलेल्या विविध चौकशा राज्याबाहेर यंत्रणांमार्फत करण्याची मागणीही त्यांनी न्यायालयात केली होती. पण न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. पोलिस महासंचालकांविरोधातही त्यांनी न्यायालयात तक्रार केली होती. अनिल देशमुख यांच्याविरोधातील पत्र मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 

एकीकडे परमबीर सिंग राज्य शासनाविरोधात दंड थोपटत असताना आता त्यांच्याविरोधातही पैसे उकळल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. क्रिकेट बुकी सोनू जालान याने ही तक्रार केली आहे. परमबीर सिंग यांनी 2018 मध्ये आपल्यावर मोक्का लावत 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले होते. तसेच पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही जालान वसुलीचे आरोप केले आहेत. 

केतन तन्ना या व्यक्तीने परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याकडून सव्वा कोटी रुपये घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्या गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. आम्हाला न्याय द्या. या प्रकरणात आम्ही दोषी असल्यास आमच्यावरही कारवाई करा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख