पतीनं सहा महिन्यांच्या बाळासह हाकललं अन् ती सरबत विकून झाली पीएसआय - After being abandoned by husband Anie Siva has become Police Sub Inspector | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

पतीनं सहा महिन्यांच्या बाळासह हाकललं अन् ती सरबत विकून झाली पीएसआय

वृत्तसंस्था
सोमवार, 28 जून 2021

शिवगिरी आश्रमाबाहेर एका स्टॅालवर लिंबू पाणी, सरबत, आईस्क्रीम तसेच हस्तकला वस्तू विकल्या. पण त्यात फारसं यश मिळत नव्हतं.

तिरूअनंतपुरम : लग्नानंतर पतीनं काही महिन्यांतच तिला घराबाहेर काढलं... तेव्हा तिचं वय होतं फक्त 18 अन् पदरात सहा महिन्याचं बाळ. समोर होता फक्त अंधार...पण तिनं त्यावर जिद्दीनं मात केली, मेहनत घेतली अन् आज ती पोलिस उपनिरीक्षक (PSI) झाली आहे. संपूर्ण पोलिस खातं तिच्या या कष्टाला सलाम करत आहे. (After being abandoned by husband Anie Siva has become Police Sub Inspector) 

अॅनी सिवा हे तिचं नाव. आज ती 31 वर्षांची असून केरळ (Kerala) मधील वरकला पोलिस ठाण्यात तिची नियुक्ती झाली आहे. केरळ पोलिसांनी ट्विट करून तिच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. अॅनी यांनी पदवीच्या पहिल्या वर्षात असताना कुटूंबियांच्या इच्छेविरूध्द लग्न केलं. पण एका मुलाच्या जन्मानंतर पतीने त्यांना घरातून हाकलून दिलं. त्यांनी आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही निराशा झाली. मग आपला मुलगा शिवसूर्या याच्यासह त्या आजीच्या घरी एका शेडमध्ये राहू लागल्या. 

हेही वाचा : कोविशिल्ड लशीवर युरोपियन युनियनने फुली मारली अन् अदर पूनावाला म्हणाले...

अॅनी यांनी नंतर वरकला शिवगिरी आश्रमाबाहेर एका स्टॅालवर लिंबू पाणी, सरबत, आईस्क्रीम तसेच हस्तकला वस्तू विकल्या. पण त्यात फारसं यश मिळत नव्हतं. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यासाठी पैसे देत मदतही केली, असं अॅनि यांनी सांगितलं. त्या पैशांचं चीज करत अॅनी आज पोलिस उपनिरीक्षक बनल्या आहेत. 

ज्या भागात स्टॅालवर सरबतं विकली, त्याच वरकला पोलिस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली आहे. 'काही दिवसांपूर्वीच माझी पोस्टिंग वरकला पोलिस ठाण्यात झाल्याचं समजलं. माझ्या लहान बाळासह मी याच ठिकाणी निराधार होते. त्यावेळी कुणीही माझ्या मदतीला नव्हते,' अशी भावना अॅनी यांनी व्यक्त केली. अनेक अडचणींचा सामना करत हे यश मिळालेल्या अॅनीवर केरळ पोलिसांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

'इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाचा खरा आदर्श. कुटूंब व पतीनं सहा महिन्याच्या बाळासह घरातून बाहेर काढलं. त्यांना रस्त्यावर सोडून दिलं.. आज ती वरकला पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक आहे,' असं ट्विट केरळ पोलिसांनी केलं आहे. केरळचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सथिसन यांनीही अॅनी यांचं कौतूक केलं आहे. त्यांचं आयुष्य आणि त्यांनी मिळवलेलं यश खूपच प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख