इसिसनं जगाला दिला इशारा; दोन स्फोटांत अमेरिकन नागरिकासह तेरा जणांचा मृत्यू

काबूल विमानतळावर कधीही इसिसचा (ISIS) हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी काही तासांपूर्वीच दिला होता.
Kabul Airport Suicide Blasts ISIS Hand Suspected
Kabul Airport Suicide Blasts ISIS Hand Suspected

काबूल : अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर (Kabul Airport) गुरूवारी रात्री एकामागोमाग दोन स्फोट झाले. हे स्फोट इसिसच्या दहशतवाद्यांनीच घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आत्मघातकी हल्ल्यामध्ये एका अमेरिकन नागरिकासह 13 जणांचा मृत्यू झाल्याचे तालिबान प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Kabul Airport Suicide Blasts ISIS Hand Suspected)

काबूल विमानतळावर कधीही इसिसचा (ISIS) हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी काही तासांपूर्वीच दिला होता. त्यानंतर काही तासांतच विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर मोठा स्फोट झाला. त्यानंतर काही वेळातच विमानतळापासून काही अंतरावर दुसरा स्फोट झाला. दोन्ही स्फोट इसिसने मानवी बॉम्बने घडवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी विमानतळाबाहेर नागिरकांची गर्दी झाली होती. याच परिसरात स्फोट झाल्यानं मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात आलो होती. 

प्राथमिक माहितीनुसार, स्फोटामध्ये एका अमेरिकन नागरिकासह 13 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जवळपास 60 हून अधिक नागरिक जखमी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आणखी हल्लाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना विमानतळ परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, हे स्फोट घडवून इसिसनं अमेरिकेसह संपूर्ण जगाला इशाराच दिला आहे. अनेक देशांनी अफगाणिस्तानातून नागरिकांना नेण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. या हल्ल्याने मोहिमेला खीळ बसणार आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने पुन्हा डोकं वर काढल्यानं जगाला हादरा बसला आहे. 

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर 11 दिवसांपासून अमेरिका आणि इतर देश नागरिकांना तेथून बाहेर काढत आहेत. इतिहासातील ही अशा प्रकारची सर्वांत मोठी मोहीम ठरली आहे. आतापर्यंत काबूलमधून 88 हजार नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. काबूल विमानतळावरुन दर 39 मिनिटांनी अमेरिकेचे लष्करी विमान बाहेर पडत आहे. कागदपत्रांची योग्य तपासणी करुनच नागरिकांना बाहेर जाऊ देण्याची अट आधीच तालिबानने घेतली आहे. 

एखाद्या गर्दीच्या बसस्थानकासारखी काबूल विमानतळाची अवस्था झाली आहे. हजारो नागरिकांचे लोंढे विमानतळावर येत आहेत. परंतु, देश सोडून बाहेर जाण्यासाठी विमानात बसण्यास अनेकांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेले अमेरिकी सैनिक विमानतळाची अंतर्गत सुरक्षा करीत आहेत. तालिबानी सुरक्षारक्षक विमानतळाबाहेर सुरक्षेसाठी तैनात आहेत. तालिबानची सत्ता असलेल्या अफगाणिस्तानमध्ये राहण्यापेक्षा हजारो नागरिक देश सोडून पलायन करीत आहेत.   

तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com