ईडीनं चौथं समन्स पाठवलं अन् देशमुखांना धक्का बसला!

ईडीने देशमुखांना यापूर्वी तीनवेळा समन्स पाठवलं आहे.
ईडीनं चौथं समन्स पाठवलं अन् देशमुखांना धक्का बसला!
Ex Minister Anil Deshmukh shocked after EDs summons

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटी वसुलीच्या आरोपांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला असून चौकशीला हजर राहण्यासाठी शनिवारी देशमुखांसह त्यांच्या मुलाला समन्स बजावण्यात आलं होतं. ईडीचं हे समन्स पाहून देशमुखांना धक्का बसला असून त्यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. (Ex Minister Anil Deshmukh shocked after EDs summons)

ईडीने देशमुखांना यापूर्वी तीनवेळा समन्स पाठवलं आहे. पण त्यांनी वय, आपलं आजारपण व कोरोनाचं कारण देत चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले आहे. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चौकशी करण्याची विनंती ईडीला केली होती. या प्रकरणात देशमुख ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. 30 जुलै रोजी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. पण न्यायालयाने सुनावणी 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर लगेचच ईडीने देशमुखांना सोमवारी (दि. 2) ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स पाठविले.

ईडीचे हे चौथे समन्स पाहून देशमुख यांनी आपल्याला धक्का बसल्याचे उत्तर ईडीला दिलं आहे. त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ईडीच्या कार्यालयात देशमुख यांचं उत्तर सादर केलं आहे. समन्सची वेळ पाहून निराश झाल्याचे आणि धक्का बसल्याचे याचं नमूद करण्यात आलं आहे. या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. ही चौकशी चुकीच्या हेतूने आणि कायद्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन करून सुरू असल्याचा आरोप देशमुखांनी याचिकेत केला आहे.

देशमुख यांनी आपल्याला वाटणारी भीती आता खरी ठरत असल्याचेही उत्तरात म्हटले आहे. ईडीकडून सुरू असलेली चौकशी निष्पक्ष नाही. ईडीकडून अधिकार आणि आपल्या ताकदीचा गैरवापर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या एक दिवस आधीच समन्स पाठवल्याने माझी भीती खरी ठरत आहे, असेही देशमुख यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, देशमुखांवर मनी लाँर्डिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये देशमुखांचे खासगी सचिव व सहायकाला अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडूनही देशमुखांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळं देशमुख सध्या ईडी व सीबीआयच्या कात्रीत सापडले आहेत. आता मंगळवारी सर्वोच्च न्यायालय त्यांच्या याचिकेवर काय निकाल देणार, यावरच ईडीसमोर हजर राहण्याबाबत त्यांचा निर्णय अवलंबून आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.