हुश्श...जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली - container ship ever given finally freed from suez canal | Politics Marathi News - Sarkarnama

हुश्श...जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मार्च 2021

सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर अखेर बाहेर पडले आहे. 

सुएझ : सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर अखेर पुन्हा पाण्यावर धावू लागले. कालव्यात हे जहाज अडकून पडल्याने जागतिक जलवाहतुकीला मोठा फटका बसला होता. अखेर हे जहाज कालव्यातून दुसरीकडे हलवण्यात यश आले आहे. यामुळे जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली असून, सुएझ कालव्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

एव्हर गिव्हन जहाजाचा कमी पाण्यात अडकून बसलेला पुढील भाग मोकळा झाला होता. तरीही कालव्यातून हे जहाज बाहेर काढणे अतिशय कठीण बाब होती. हे जहाज बाहेर काढण्याचे काम स्मिट सॅल्व्हेज ही कंपनी करीत होती. पुढील मोहिमेसाठी भरतीची प्रतीक्षा होती. भरती आल्यानंतर हे जहाज बाहेर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आणि अखेर ते यशस्वी झाले. जहाज पूर्णपणे सरळ झाले आणि ते सुएझ कालव्यातून पुढे रवाना झाले. 

दरम्यान, याआधी बोलताना स्मिट सॅल्व्हेज कंपनीची पालक कंपनी असलेल्या बोस्कालीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर बेर्डोवस्की म्हणाले  होते की, जहाज अंशत: पाण्यावर तरंगू लागले ही बाब चांगली असली तरी ही संपूर्ण मोहीम पार पाडणे खूप अवघड आहे. जहाजाच्या पुढील भागाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येईल. जहाजाचे तोंड पूर्णपणे रिकामे करण्यासाठी हा प्रयत्न केला जाईल. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यास जहाजावरील कंटेनर उतरवण्याचा मार्ग अखेर स्वीकारावा लागेल. 

हेही : सुएझमध्ये अडकलेलं महाकाय जहाज अखेर तरंगलं...

एव्हर गिव्हन हे महाकाय जहाज 400 मीटर (1 हजार 300 फूट) लांबीचे आहे. या जहाजातील सर्वच्या सर्व कर्मचारी भारतीय आहेत. जगातील सर्वाधिक व्यग्र असलेला जलवाहतूक मार्ग या जहाजाने सुमारे आठवडाभर रोखून धरला होता. यामुळे दररोज 9.6 अब्ज डॉलरचा माल अडकून पडला होता. याचाच परिणाम होऊन अनेक जहाजे समुद्रात अडकून पडली होती. काही जहाजांनी लांबचा आफ्रिकेचा मार्ग स्वीकारला आहे. आता ही कोंडी अखेर सुटली आहे.  

हेही वाचा : खरी परीक्षा अजून बाकीच...

याविषयी इजिप्तच्या सुएझ कालवा प्राधिकरणाचे प्रमुख ओसामा रॅबी म्हणाले  होते की, आशिया व युरोपमध्ये मालवाहतूक करणारे एव्हर गिव्हन हे जहाज २३ मार्चला सुएझ कालव्यात अडकले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात जहाजांचा मार्ग रोखला गेला. ते हटविण्यासाठी मागील आठवडाभरापासून अथक प्रयत्न सुरू होते. अखेर आज सकाळी ११ टगबोटींच्या मदतीने हे जहाज ८० टक्के अंशात सरळ करण्यात यश आले. जहाज सरळ काढण्यासाठी १८ मीटर खोलीपर्यंत २७ हजार घनमीटर वाळू उपसण्यात आली. 

जागतिक जलवाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुएझ कालव्यातील वाहतूक लवकरच सुरळीत होईल, अशी आशा आहे. जगातील १२ टक्के मालवाहतूक ही सुएझ कालव्यामार्गे होते. या कालव्यात एव्हर गिव्हन आडवे अडकल्याने हा मार्ग बंद झाला होता. यामुळे मार्गाच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ सुमारे ३०० मालवाहू व तेलवाहू जहाजांची मोठी रांग लागली आहे. कोरोना संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यातच या जहाजामुळे व्यापारी जलवाहतूक ठप्‍प झाली. काही मालवाहू जहाजांनी पुढे जाण्यासाठी सुएझऐवजी आफ्रिकेतील दक्षिण भागातून जाणारा लांब पल्ल्याच्या व खर्चिक मार्गाचा पर्याय निवडला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख