'सुएझ' कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज अखेर तरंगलं पण कोंडी कायम!

सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन मालवाहू जहाज पुन्हा पाण्यावर तरंगू लागले आहे.
ever given ship is partially refloat but still stuck in suez canal
ever given ship is partially refloat but still stuck in suez canal

सुएझ : सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर अखेर पुन्हा पाण्यावर तरंगू लागले आले. कालव्यात हे जहाज अडकून पडल्याने जागतिक जलवाहतुकीला मोठा फटका बसला होता. जहाजाची दिशा 80 टक्के बदलण्यात यश आले असून, ते कालव्यातून दुसरीकडे हलवण्यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सुएझमधील कोंडी अद्याप कायम आहे. या जहाजातील सर्वच्या सर्व कर्मचारी भारतीय आहेत. 

एव्हर गिव्हन हे महाकाय जहाज 400 मीटर (1 हजार 300 फूट) लांबीचे आहे. जगातील सर्वांधित व्यग्र असलेला जलवाहतूक मार्ग या जहाजाने सुमारे आठवडाभर रोखून धरला आहे. यामुळे दररोज 9.6 अब्ज डॉलरचा माल अडकून पडत आहे. याचाच परिणाम होऊन अनेक जहाजे समुद्रात अडकून पडली आहेत आणि काही जहाजांनी लांबचा आफ्रिकेचा मार्ग स्वीकारला आहे. 

याविषयी इजिप्तच्या सुएझ कालवा प्राधिकरणाचे प्रमुख ओसामा रॅबी म्हणाले की, आशिया व युरोपमध्ये मालवाहतूक करणारे एव्हर गिव्हन हे जहाज २३ मार्चला सुएझ कालव्यात अडकले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात जहाजांचा मार्ग रोखला गेला आहे. ते हटविण्यासाठी मागील सहा दिवसांपासून अथक प्रयत्न सुरू आहेत. अखेर आज सकाळी ११ टगबोटींच्या मदतीने हे जहाज ८० टक्के अंशात सरळ करण्यात यश आले. जहाज सरळ काढण्यासाठी १८ मीटर खोलीपर्यंत २७ हजार घनमीटर वाळू उपसण्यात आली. 

जागतिक जलवाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुएझ कालव्यातील वाहतूक लवकरच सुरळीत होईल, अशी आशा आहे. परंतु, अद्याप यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण जमिनीत एका बाजूला रुतलेले जहाजाचे तोंड रिकामे करुन त्याची दिशा काही प्रमाणात सरळ झाली आहे. मात्र, जहाजाची दिशा पूर्णपणे सरळ करुन ते कालव्यातून बाहेर काढण्यास आणखी कालावधी लागणार आहे. यामुळे जलवाहतूक कोंडी अद्याप सुटलेली नाही.  

जगातील १२ टक्के मालवाहतूक ही सुएझ कालव्यामार्गे होते. या कालव्यात एव्हर गिव्हन आडवे अडकल्याने हा मार्ग बंद झाला होता. यामुळे मार्गाच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ सुमारे ३०० मालवाहू व तेलवाहू जहाजांची मोठी रांग लागली आहे. कोरोना संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यातच या जहाजामुळे व्यापारी जलवाहतूक ठप्‍प झाली. काही मालवाहू जहाजांनी पुढे जाण्यासाठी सुएझऐवजी आफ्रिकेतील दक्षिण भागातून जाणारा लांब पल्ल्याच्या व खर्चिक मार्गाचा पर्याय निवडला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com