वसंतदादांचा नातू नाराज आहे; पण....

विशाल पाटीले हे संघटनात्मक पद घेण्यासाठी पहिल्यांदाच शर्यतीत होते. त्यांना जिल्‍ह्याचे अध्यक्षपद हवे होते.
Vishal Patil upset over not getting Congress district president post in Sangli
Vishal Patil upset over not getting Congress district president post in Sangli

सांगली : काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदी संधी न देऊन विशाल पाटील यांच्यावर अन्याय केल्याची त्यांच्या समर्थकांची भावना झाली आहे. ती उघडपणे बोलूनही दाखवली जात आहे. या स्थितीत जे हाती आले आहे, त्याचे सोने करून दाखवावे, असा एक सूर त्यांच्या समर्थकांतून येत आहे. त्यामुळे विशाल पाटील राज्याचे प्रदेश उपाध्यक्षपद स्वीकारून काम सुरू करणार, असे संकेत मिळत आहेत. ‘वसंतदादांचा नातू’ नाराज आहे, मात्र तो काँग्रेस सोडून जाण्याच्या मानसिकतेत नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. (Vishal Patil upset over not getting Congress district president post in Sangli)

काँग्रेसने राज्यात संघटनात्मक पुनर्बांधणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली नवी टीम तयार केली आहे. त्यात जिल्हाध्यक्षांची नेमणूक झालीच, शिवाय १०४ सचिव आणि २२ उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. वसंतदादा पाटील यांचे नातू व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटीले हे संघटनात्मक पद घेण्यासाठी पहिल्यांदाच शर्यतीत होते. त्यांना जिल्‍ह्याचे अध्यक्षपद हवे होते. 

सध्या सांगली जिल्‍हा काँग्रेसचे अध्यक्षपद दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू, आमदार मोहनराव कदम यांच्याकडे होते. त्यावर राज्यमंत्री ‍विश्‍वजित कदम गटाने दावा केला होता आणि विश्‍वजित यांचे मावस बंधू आमदार विक्रम सावंत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात ते यशस्वीदेखील झाले. विशाल यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी प्रदेशाचे उपाध्यक्षपद मिळूनही ना जल्लोष केला, ना प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ते काय करणार, याबाबत उत्सुकता होती. 

हाती आलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील यांनी समर्थकांशी याबाबत चर्चा केली असून ते नाराज असले तरी पद स्वीकारून काँग्रेसमध्ये नवा झंझावात निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. वसंतदादा पाटील यांना मानणारा गट राज्यभर आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक गावांत दादासमर्थक गट आहे. त्याची पुनर्बांधणी त्यांनी करावी, असे त्यांच्या समर्थकांनी आग्रहीपणे सांगितले आहे. प्रदेश पातळीवरील निवडीच्या निमित्ताने विशाल पाटील हे पुन्हा एकदा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात आले आहेत.

जयंत पाटलांचे टोमणे थांबतील

विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती. त्यामुळे त्यांना स्वाभिमानीचे नेते, असे म्हणून काँग्रेसपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला जात होता. जलसंपदा मंत्री जयंत पाटील तर टोमणे मारत होते, तो प्रकार आता थांबेल, असे काही समर्थकांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com