जयंत पाटलांची शिवसेना आमदारास थेट राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर

जयंत पाटील यांनी रविवारी रात्री अनिल बाबर यांना ‘तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी करेक्ट फिल्डिंग लावावी लागत आहे’, असे म्हटले.
Jayant Patil's offer to Shiv Sena MLA to join NCP
Jayant Patil's offer to Shiv Sena MLA to join NCP

सांगली : राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या तीनही पक्षांनी सरकार स्थापन करताना आपापला पक्ष वाढवण्याची सर्वांनी मुभा असेल, असे जाहीर केले होते. सोबतच तीन पक्षांत शक्यतो एकमेकांचे शिलेदार फोडायचे नाहीत, असा तह झाला होता. त्याला फार काळ लोटलेला नाही. तरीही राज्यात काही ठिकाणी तीन पक्षांत इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे, हा खेळ सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट शिवसेनेचे खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली आहे. यानिमित्ताने जयंतराव शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाराजी का ओढवून घेत आहेत, असा प्रश्‍न चर्चेला आला आहे. (Jayant Patil's offer to Shiv Sena MLA to join NCP)

जयंत पाटील यांनी रविवारी रात्री अनिल बाबर यांना ‘तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी करेक्ट फिल्डिंग लावावी लागत आहे’, असे म्हटले. त्याआधी आमदार बाबर आणि त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर यांनी जयंत पाटील यांना ‘खानापूर विधानसभा मतदार संघात तुम्ही फार लक्ष घालणार असल्याचे समजते. तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याऐवजी या भागात टेंभूचे पाणी देऊन दुष्काळाचा कार्यक्रम करा’, असे साकडे घातले.

अनिल बाबर हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. ते दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र. आबांना राजकारणात पुढे आणण्यात बाबर यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा नेहमी काँग्रेसकडे गेली आणि बाबर यांना सतत बंडखोरी करून निवडणूक लढवावी लागली. त्यात त्यांना यशही आले. मात्र २००९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनी २०१४ ला भाजप-शिवसेना युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्याने धनुष्यबाण हाती घेतला. त्या चिन्हावर ते दोनवेळा विजयी झाले.

युतीच्या सत्ता काळात बाबर शिवसेनेत होते, मात्र त्यांचे सूत भाजपशी अधिक जुळले. त्यामुळे २०१९ ला ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. ती फोल ठरली. ते शिवसेनेत राहिले आणि जिंकलेही. आता ते शिवसेनेत रुळले आहेत. मुख्यमंत्र्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेनेत त्यांना बळ मिळाले आहे. त्यांनी भाजपशी सलगी कमी करत आणलेली असताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी येण्याची गळ घालून नवा डाव टाकला आहे. अर्थात, बाबर मुरब्बी आहेत. त्यांना जयंत पाटील यांचे राजकीय डाव पक्के माहिती आहेत.

सध्या या मतदार संघातील माजी आमदार व काँग्रेसचे प्रबळ नेते सदाशिवराव पाटील यांना जयंतरावांनी राष्ट्रवादीत आणले आहे. त्यांच्यासाठी येथे तयारीही ताकदीने सुरु आहे. अशावेळी बाबर यांना राष्ट्रावादीत घेऊन ते एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचा प्रयत्न करताहेत की बाबर यांची फिरकी घेताहेत, असाही मुद्दा चर्चेत आला आहे. अनिल बाबर हे शिवसेनेचे जिल्ह्यातील पहिले आमदार असल्याने शिवसना त्यांना भविष्यात मंत्रीपदी संधी देईल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे. त्यामुळे जयंतरावांनी हात पुढे केला असला तरी बाबर यांना शिवसेनाच प्रिय राहील, असे त्यांचे समर्थक सांगतात. जयंतराव मात्र शिवसेनेच्या आमदाराला ऑफर देऊन ठाकरेंशी पंगा घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com