सांगलीच्या राजकारणाचा नवा ट्रेलर : जयंतरावांच्या उजवीकडे सुमनताई, तर डावीकडे संजयकाका!

खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादीसोबतचा वाढता घरोबा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
BJP MP Sanjay Patil's presence at Jayant Patil's progra
BJP MP Sanjay Patil's presence at Jayant Patil's progra

सांगली : सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भुवया उंचवायला लावणारे चित्र खासदार संजयकाका पाटील यांच्यानिमित्ताने सतत समोर येत आहे. आजही कवठे महांकाळ तालुक्यात त्यांनी टेंभू योजनेच्या जलपूजन समारंभात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे जयंत पाटील हे पाण्यात श्रीफळ अर्पण करत असताना त्यांच्या उजवीकडे आमदार सुमनताई आर. आर. पाटील होत्या, तर डावीकडे संजयकाका पाटील होते. हा जिल्ह्याच्या नव्या राजकारणातील ‘ट्विस्ट’चा ट्रेलर तर नाही, असेच चित्र चर्चेत आले आहे. (BJP MP Sanjay Patil's presence at Jayant Patil's program)

खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादीसोबतचा वाढता घरोबा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी त्यांनी फारच जुळवून घेतले आहे. भाजपच्या प्रमुख कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते, मात्र जयंतरावांचे सार्वजनिक कार्यक्रमही ते चुकवत नाहीत, हे नजरेतून सुटलेले नाही.

महापौर निवडीत राष्ट्रवादीने भाजपला सत्ता असताना धोबीपछाड दिल्यानंतर जयंत पाटील यांच्या एका कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार घातला होता, त्या कार्यक्रमात संजयकाका पाटील मात्र हजर राहिले होते. आजही त्यांनी हजेरी लावून लक्ष वेधून घेतले. अर्थात, ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना टेंभू योजनेच्या या कामासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या हजेरीकडे केवळ राजकीय दृष्टीने पाहणे योग्य होणार नाही, असा युक्तिवाद त्यांचे समर्थक नक्कीच करतील.

या साऱ्यात जयंत पाटील यांच्याकडून सुरू असलेली राजकीय आखणी अधिक चर्चेचा विषय बनली आहे. दिवंगत आर. आर. पाटील गटाच्या तासगाव-कवठेमहांकाळ येथील प्रभावाला संजय पाटीलच आव्हान ठरू शकतात. अशावेळी ते आर. आर. गटाचे पारंपरिक विरोधक संजयकाकांना कशी ताकद देत आहेत, असाही मुद्दा चर्चेला येत असतो. त्याचवेळी संजयकाकांनी गेल्या काही काळात आर. आर. गटाविरुद्ध सौम्य भूमिका घेतली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकारणाला नवा ट्विस्ट आला, तर आश्‍चर्य वाटायला नको. त्यामुळे जयंतरावांच्या उजवीकडे सुमनताई आणि डावीकडे संजयकाका, हे चित्र भविष्यातील नव्या राजकीय स्थितीचा ट्रेलर असू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com