अॅापरेशन कमळ : भाजपला जोरदार झटका...उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश - Set back to karnataka cm bs yediyurappa for operation kamal | Politics Marathi News - Sarkarnama

अॅापरेशन कमळ : भाजपला जोरदार झटका...उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मार्च 2021

भाजपकडून कर्नाटकसह मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी 'अॅापरेशन कमळ' राबविले होते. 

बेंगलुरू : कर्नाटकसह मध्य प्रदेशात भाजपने काँग्रेसचे सरकार पाडून सत्ता स्थापन केली आहे. त्यासाठी 'अॅापरेशन कमळ' राबवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस व इतर पक्षांनी केला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातही 'अॅापरेशन कमळ' ची चर्चा सुरू झाली होती. पण 'अॅापरेशन कमळ' आता भाजपच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये भाजपने 2019 मध्ये काँग्रेस-जेडीयु सरकार पाडले. त्यानंतर बी. एस. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. येडीयुरप्पा यांनीच 'अॅापरेशन कमळ' राबवून सरकार पाडल्याचा आरोप काँग्रेस व जेडीयूने केला होता. हे येडीयुरप्पा यांचेच षडयंत्र असल्याचा आरोप करत जेडीयुचे नेते नगन गौडा यांचे पुत्र शरण गौडा यांनी त्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा : ममतांचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाल्या, आला वेळ आलीय...

गौडा यांचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर आज उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे 'अॅापरेशन कमळ'मधील येडीयुरप्पा यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येडीयुरप्पा यांना चांगलाच झटका बसला आहे.

येडीयुरप्पा यांनी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले होते. त्यावेळी एक कथित ध्वनीफीत व्हायरल झाली होती. त्यामुळे येडीयुरप्पा एका आमदाराच्या मुलाला वडिलांना पदाचा राजीनामा देण्यास सांगत होते. राजीनामा देऊन पक्ष बदलण्याची विनंती ते करत होते. या मुलाशी बोलताना येडीयुरप्पा यांचा आवाज होता, असे आरोप येडीयुरप्पा यांच्यावर आहेत. येडीयुरप्पा यांनी मात्र हे आरोप त्यावेळीच फेटाळून लावले होते. आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याबाबतची याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा : भाजपची फजिती; प्रचारासाठी वापरला काँग्रेस खासदाराच्या पत्नीचा फोटो

काय आहे 'अॅापरेशन कमळ'?

2008 च्या निवडणूकीनंतर सर्वाधिक 110 जागा मिळवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. पण बहुमताचा 113 चा आकडा पक्ष गाठू शकला नाही. त्यासाठी त्यांनी 6 अपक्ष आमदारांना गळ घातली. पण त्यांच्या जीवावर सरकार फारकाळ टिकू शकत नाही. याचा अंदाज असल्याने येडीयुरप्पा यांनी जेडीएस व काँग्रेसकडे आपला मोर्चा वळवला. या तयारीलाच 'अॅापरेशन कमळ' हे नाव देण्यात आले. सात आमदारांना राजीनामा द्यायला लावून त्यापैकी 5 जणांना त्यांनी निवडूणही आणले. 2019 मध्येही हे 'अॅापरेशन कमळ' यशस्वी करण्यात येडीयुरप्पांना इतर पक्षांतील आमदारांची साथ मिळाली.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख