ममतांचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाल्या, आता वेळ आलीय... - CM Mamata Banerjee writes to leaders Sonia Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ममतांचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाल्या, आता वेळ आलीय...

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मार्च 2021

ममतांना राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनेही बंगाल निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे घमासान सुरू आहे. भाजपकडून बंगालचा गड मिळवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. अनेक केंद्रीय मंत्री, भाजपचे मुख्यमंत्री, देशभरातील खासदार, आमदारांची फौज बंगालमध्ये दाखल झाली आहे.तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही भाजपचा पराभव करण्यासाठी जोरदार लढा देत आहेत. पण सध्या तृमणूल काँग्रेससाठी त्यास एकट्याच गड लढवत आहेत. 

ममतांना राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना, आप, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, डीएमके आदी प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. पण प्रत्यक्षात प्रचारासाठी अद्याप या पक्षांचे नेते बंगालमध्ये दाखल झालेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. पण त्यांना पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. त्यातच ममतांनी बंगालमधील विरोधात असलेल्या काँग्रेससह भाजपविरोधी सर्व पक्षांना पत्र लिहिले आहे.

त्यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, एम. के. स्टॅलिन, तेजस्वी यादव यांचा समावेश आहे. ''लोकशाही व संविधानावर होत असलेल्या हल्ल्यांमुळे आता भाजपच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन त्यांना प्रतिकार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण मनाने एकत्र आल्याशिवाय हे शक्य होणार नाही. मी त्यासाठी झोकून देत काम करायला तयार आहे, '' असे आवाहन ममतांनी पत्रातून केले आहे. 

हेही वाचा : भाजपची फजिती; प्रचारात वापरला काँग्रेस खासदाराच्या पत्नीचा फोटो

राज्यपाल कार्यालयाचा दुरूपयोग

''भाजपची सत्ता असलेल्या राज्यात राज्यपाल कार्यालयाचा दुरूपयोग केला जात आहे. निवडूण आलेल्या आमदारांना अडचणी निर्माण केल्या जात आहेत. संसदेत दिल्लीसाठी एनसीटी विधेयक पास करणे म्हणजे विकासाला अडचण आहे. भाजप सरकारने लोकांनी निवडूण दिलेल्या सरकारचे सर्व अधिकार हिसकावले आहेत. त्यामुळे तेथील राज्यपाल आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसाठी काम करतील,'' असे ममतांनी पत्रात नमुद केले आहे. 

भाजपकडून तपास यंत्रणांचा दुरूपयोग 

केंद्र सरकारकडून सीबीआय, ईडी आणि इतर यंत्रणांचा भाजपविरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांविरूध्द चुकीच्या पध्दतीने वापर केला जात आहे. पश्चिम बंगाल व तमिळनाडूमध्ये ईडीकडून तृणमूल व डीएमकेच्या नेत्यांच्या नेत्यांवर रेड टाकली जात आहे. केवळ भाजपशी कधीही संबंध नसलेल्या नेत्यांनाच लक्ष्य केले जात आहे. केंद्र सरकारकडून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमधील निधी थांबविला जातो. त्यामुळे विकास व कल्याणकारी योजना राबविणे कठीण जात आहे. देशातील संस्थांचे खासगीकरण करण्याचे भाजपचे धोरणही लोकशाहीवर घाला घालणारे आहे, अशी टीका ममतांनी पत्रात केली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख