मनोहरमामाचा पोलिसांकडील ‘पाहुणचार’ वाढला; महागडी मोटारही जप्त

न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मनोहरमामाचा पोलिसांकडील ‘पाहुणचार’ वाढला; महागडी मोटारही जप्त
Manohar Bhosale's police custody extended by three days

माळेगाव (जि. पुणे) : अघोरी पद्धतीने उपचार आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी अटक केलेल्या मनोज ऊर्फ मनोहरमामा भोसले याच्या पोलिस कोठडीत आज (ता. १६ सप्टेंबर) बारामती न्यायालयाने वाढ केली. भोसले याला येत्या १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच, त्याची महागडी मोटारही पोलिसांनी जप्त केली आहे. (Manohar Bhosale's police custody extended by three days)

मनोहरमामा भोसले याची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्याला आज (ता. १६ सप्टेंबर) बारामती न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सरकारी वकिलाच्या मागणीनुसार न्यायालयाने मनोहरच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला आहे..

दरम्यान, आपण बाळूमामांचा वशंज असल्याचे सांगत मनोहर भोसले हा लोकांची फसवणूक करत होता. त्याच्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील आश्रमात अनेक बड्या आसामींची ये-जा होती. मनोहर भोसले याने कर्करोगावर अघोरी इलाज केल्याची फिर्याद बारामतीतील शशिकांत खरात यांनी दिली होती. त्यावरून मनोहर भोसले, नाथबाबा ऊर्फ विशाल वाघमारे आणि ओंकार शिंदे या तिघांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणी संशयित आरोपी मनोहरमामाला लोणंद (जि. सातारा) जवळील सालपे येथील फार्म हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मनोहरमामाला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बारामती तालुका पोलिसांनी मनोहरमामाची एक्सयूव्ही ही महागडी मोटारही जप्त केली आहे. 

या प्रकरणातील संशयित आरोपी असलेले नाथबाबा ऊर्फ विशाल वाघमारे आणि ओंकार शिंदे हे दोघे अद्यापपर्यंत फरारी आहेत. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी व त्यांच्याकडून अधिकची माहिती मिळण्यासाठी तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी सरकारी वकिलाच्या माध्यमातून मनोहर भोसले याला आणखी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. बारामती न्यायालयाने ती मान्य करत त्याला आणखी तीन दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in