विधानसभा अध्यक्षपद सोडलं अन् तासाभरातच लागली मंत्रिपदाची लॉटरी

भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होण्याआधी तासभर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी राजीनामा दिला होता.
after resigning assembly speaker post rajendra trivedi gets cabinet berth
after resigning assembly speaker post rajendra trivedi gets cabinet berth

गांधीनगर : विजय रूपानी (Vjay Rupani) यांनी गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे आले आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी झाला असून, यात 24 मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधी तासभर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले राजेंद्र त्रिवेदी यांचाही यात समावेश आहे. ते नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असतील.  

या शपथविधीच्या तासभर आधी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारून, तो आजपासूनच लागू झाला होता. यानंतर तासाभरातच त्रिवेदी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आज शपथविधीत सर्वांत प्रथम शपथ घेणारे त्रिवेदी हेच होते. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात ते दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर महत्वाची खात्याची धुरा सोपवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात 24 मंत्री आहेत. आज त्यांचा शपथविधी झाला. नव्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे आधीच्या सर्व मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. जातीय समीकरणांचा समतोल राखतानाच स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळात विशेष करून स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पावले उचलत सर्व नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भूपेंद्र पटेल यांचे नवे मंत्रिमंडळ 
कॅबिनेट मंत्री :
राजेंद्र त्रिवेदी, जीतू वाघानी, राघव पटेल, पूर्णेश मोदी, नरेशभाई पटेल, प्रदीपसिंह परमार, अर्जुनसिंह चव्हाण, ऋषिकेश पटेल, कनुभाई देसाई, किरीटसिंह राणा
राज्यमंत्री : हर्ष संघवी, बृजेश मेरजा, मनिषा वकील, जगदीशभाई पांचाल, जीतूभाई चौधरी, निमिषा सुतार, मुकेश पटेल, अरविंद रैयाणी, कुबेर डिंडोर, कीर्तिसिंह वाघेला, गजेंद्रसिंह परमार, देवाभाई मालम, राघवजी मकवाना, विनोदभाई मोराडिया

नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी काल (ता.15) होणार होता. त्याआधीच भाजपमध्ये वाद उफाळला होता. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्व मंत्रिमंडळात बदल हवा होता. यामुळे अंतर्गत नाराजी वाढली होती. सुमारे 90 टक्के मंत्र्यांना बदलले जाईल, अशी चर्चा होती. यामुळे आधीच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता होती. यामुळे अखेर शपथविधीसाठी आजचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन राजीनामा सोपवला होता. यानंतर भाजपच्या आमदारांची बैठक होऊन त्यात भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. नंतर पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com