गर्दी पाहून आव्हाड म्हणाले, ‘आर.आर. आबांच्या काळातील उत्साहाची आठवण झाली’

ज्या शहरावर एकेकाळी राज्य केले, त्याची पुनरावृत्ती करायचीआहे.
Leaders are active to increase the strength of NCP in Kalyan-Dombivali
Leaders are active to increase the strength of NCP in Kalyan-Dombivali

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका जवळ येताच प्रत्येक पक्ष सक्रिय होत असतानाच शहरात रसातळाला गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेत आहे. पक्षांतर्गत कुरघोडी, गटातटाचे राजकारण यामुळे बॅकफूटवर गेलेल्या पक्षाला पुन्हा फ्रंटवर आणणे आणि २००५ ची पुनरावृत्ती करत कल्याण-डोंबिवलीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी स्थानिक नेते कामाला लागले आहेत. शहरातील १२२ प्रभागांत लढण्याची रणनीती स्थानिक नेत्यांनी आखली असली तरी नाराजींची मनधरणी करण्‍याचा सल्ला वरिष्ठांनी दिला आहे. महापालिका निवडणुकीतही युतीचे संकेत दिले जात असले तरी प्रत्येक प्रभागात आपले स्थान निर्माण करण्याची सुरवात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (Leaders are active to increase the strength of NCP in Kalyan-Dombivali)

दरम्यान, शहरात काल झालेल्या मेळाव्यात बोलताना ‘भिवंडीनंतर कल्याण-डोंबिवलीत कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून खूष झालो. (स्व.) आर. आर.(आबा) पाटील यांच्या काळात जो उत्साह होता, त्याची आठवण झाली. ज्या शहरावर एकेकाळी राज्य केले, त्याची पुनरावृत्ती करायची असून त्यादृष्टीने रणनीती आखा, असा मोलाचा सल्ला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

राज्यात महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी पक्षाने निश्चित उभारी घेतली असली तरी, स्थानिक पातळीवर पक्षाची अधोगती गेल्या काही वर्षांत झाली आहे. एकेकाळी कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादीचे सध्या महापालिकेत जेमतेम दोन नगरसेवक आहेत. महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाली असताना गेल्या पाच वर्षात संघटनात्मक बांधणीसाठी काहीच हालचाली पक्षाकडून झाल्या नाहीत. गटातटाचे राजकारण, श्रेयवाद आणि वर्चस्ववाद पक्षात पाहायला मिळाला. महाविकास आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीत पक्ष मजबुतीसाठी पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्याचे काम पक्षाने हाती घेतले आहे. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश हनुमंते यांची उचलबांगडी करत पक्षाला उभारी देण्यासाठी जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार व ज्येष्ठ नेते जगन्नाथ शिंदे यांच्यावर, तर कार्याध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते अप्पा शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रवादीचे वजन पुन्हा वाढविण्यासाठी रणनीती आखली असून त्या दृष्टीने कामही सुरू केले आहे. याची प्रचिती डोंबिवलीत रविवारी पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातील गर्दीवरून स्पष्ट झाले. याबद्दल शिंदे यांचे कौतुक गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील केले. 

वार्डनिहाय बूथबांधणी पक्षाकडून केली जात आहे. एका विधानसभा क्षेत्रात २ ते ३ जनसंपर्क कार्यालय, प्रभागनिहाय कार्यालय सुरू करून राष्ट्रवादीचे स्थान निर्माण केले जात आहे. तसेच, सोशल मीडिया सेल, वॉर रूम तयार केली गेली असून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन तयार केले जात असल्याची माहिती शिंदे यांनी डोंबिवलीत दिली. 

मागील निवडणुकांचा आढावा घेता २००० मध्‍ये पहिल्यांदा लढवलेल्या कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत पक्षाचे १० नगरसेवक निवडून आले. सन २००५ मध्ये २५, तर २०१० मध्ये १४ नगरसेवक निवडून आले. महापलिकेत २००५ मध्ये अपक्षांच्या मदतीने अडीच वर्षे का होईना राष्ट्रवादीने सत्ता उपभोगली. अप्पा शिंदे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात २००५ मध्ये  राष्ट्रवादी पक्षाचा महापौर पहिल्यांदा कल्याण-डोंबिवली महापालिकेत विराजमान झाला होता, तर डॉ. वंडार पाटील यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद भूषविले होते. 

 आता आम्ही स्वयंसिद्ध : जगन्नाथ शिंदे

आगामी महापालिका निवडणुकीत १२२ प्रभाग लढविण्याची तयारी केली आहे. पक्षाचा निर्णय होईल; तो मान्य असेल. पण, आता आम्ही स्वयंसिद्ध झाले आहोत, असे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलताना ज्येष्ठ नेते जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. 

 
घरातील भांडण घरातच मिटवा : आव्हाड

भिवंडीनंतर कल्याण-डोंबिवलीत मेळाव्याला झालेली गर्दी पाहून मंत्री जितेंद्र आव्हाड खूष झाले होते. ज्या शहरावर एकेकाळी राज्य केले आहे, त्याची पुनरावृत्ती करायची असून त्यादृष्टीने रणनीती आखा. याच गतीने गेलो, तर युती होईल याचा विचार केला पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले. पक्षात खूपजण अस्वस्थ आहेत, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा, साहेबांची भेट घडवा. नाराज होऊन गेलेले पुन्हा घरी परतत असतील तर, त्यांना सोबत घ्या. घरातील भांडण घरातच सोडवली पाहिजेत, असा मोलाचा सल्ला त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com