अवघ्या दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो; पण.... 

ओबीसी समाजाला शिक्षणात मिळणाऱ्या सवलती मराठा समाजाला लागू कराव्यात.
अवघ्या दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो; पण.... 
Battle of Maratha reservation has to be fought with restraint : Sambhaji Raje

पुणे  ः अवघ्या दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो; पण आपल्याला ते करायचं नाही, असे सांगून मराठा आरक्षणाची लढाई आपण संयमाने लढत असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. (Battle of Maratha reservation has to be fought with restraint : Sambhaji Raje)

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांच्या पुण्यात आज (ता. ९) झालेल्या बैठकीत संभाजीराजे छत्रपती बोलत होते. त्या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्यातील लोक एकत्र आले, याचे समाधान आहे. जे लोक अनेक वर्षे तोंडेही पाहत नव्हते, ते आज या बैठकीसाठी एकत्रित आले आहेत. याच पद्धतीने आपल्याला मराठा आरक्षणाची लढाई लढायची आहे आणि जिंकायचीसुद्धा आहे.

मराठा आरक्षणाबाबत होत दिरंगाईवरून संभाजीराजे म्हणाले की, आरक्षणाच्या लढाईसाठी मी आता मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहे. बेमुदत अथवा लाक्षणिक उपोषण करण्याची माझी तयारी आहे, त्याबाबत तुम्हीच ठरवा आणि मला सांगा, असेही संभाजीराजेंनी समन्वयकांना सूचविले. ओबीसी समाजाला शिक्षणात मिळणाऱ्या सवलती मराठा समाजाला लागू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी या वेळी बोलताना केली.

मराठा आरक्षणासंदर्भात दोन मूक आंदोलने झाली आहेत, तरीही राजे शांत, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र, महापूर आला म्हणून आम्ही थांबलो होतो. दोन महिने झाले आहेत आता. कोविडची परिस्थिती सुधारते आहे. पण, मराठा समाजाचे एवढी आंदोलने झाली आहेत. आणखी एक आंदोलन करावे लागणार. त्यामुळे येत्या २० ऑगस्ट रोजी  नांदेड येथे एक मूक आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही या वेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. तसेच मराठा आरक्षणाची लढाई ही संयमाने लढत असल्याचेही संभाजीराजे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

संभाजीराजे म्हणाले की, सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही आरक्षणात काहीही करू शकणार नाही. ज्या लोकांना समाजाबद्दल काही माहिती आहे, असेच लोक आयोगाच सदस्य झाले पाहिजेत. आरक्षणाचा लढा अनेक दिवस चालेल, पण आपल्या मागण्याचं काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांसोबत २२ मागण्यांच्या संदर्भात  बैठक झाली. मात्र, अजून त्यातील काहीही झालेलं नाही. आता दोन महिने झाले आहेत. त्यामुळे सरकारने आता वसतिगृहाबाबतचा अध्यादेश काढून दाखवावा. 

अजित पवार-शाहू महाराजांच्या भेटीवर संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात जाऊन छत्रपती शाहू महाराजांना भेटले, त्यावेळी ‘चहा प्यायला म्हणजे विषय संपला असे होत नाही,’ असे अनेकजण म्हणाले होते. महाराज मॅनेज झाले, अशीही चर्चा झाली. पण, ज्या दिवशी मॅनेज होईल, त्या दिवशी घरी जाऊन बसेल, छत्रपती असे मॅनेज होणारे नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवा, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीबाबत स्पष्ट केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे १४ जुलै रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना छत्रपती शाहू महाराज यांची नवीन राजवाडा येथे भेट घेतली होती. पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये त्या वेळी एक तास चर्चा झाली होती. त्या भेटीवरून राज्यात उलटसुलट चर्चा झाली होती. त्यांना संभाजीराजेंनी आज प्रत्युत्तर दिले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in