आलिशान हॉटेलला टाळत निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी जेवले अजितदादा!

साधे ग्रामीण धाटणीचे जेवण अतिशय चवदार झाल्याची त्यांनी पावतीही दिली.
Ajit Pawar (20).jpg
Ajit Pawar (20).jpg

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP), राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), यांना पक्ष पदाधिकारीच नाही, तर कार्यकर्त्यांची सुद्धा नावानिशी खडानखडा माहिती आहे. ते त्यांच्या निष्ठेची तेवढी जाणही ठेवतात. त्यांना जपतात. त्यातूनच अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते हे आमदार, खासदार झाले आहेत. हाच कित्ता उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar), पुढे चालवितांना दिसत आहेत. त्याचा प्रत्यय शुक्रवारी (ता.१७) त्यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यात आला.

आलिशान हॉटेल वा पुढेमागे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांऐवजी पक्षाची दोन पिढ्यांपासून सेवा करणाऱ्या एकनिष्ठ अशा दिघी येथील वाळके कुटुंबाच्या घरी त्यांनी रात्रीचे भोजन करून हा कार्यकर्ता व त्याच्या कुटुंबाची जाण ठेवली. साधे ग्रामीण धाटणीचे जेवण अतिशय चवदार झाल्याची त्यांनी पावतीही दिली. त्यामुळे या कुटुंबातील महिला भारावून गेल्या. (Ajitdada ate at the house of a party worker-vs87)

१९७२ पासून शरद पवारांबरोबर काम करणारे दिघीचे माजी सरपंच साहेबराव वाळके यांच्या घरी मासवडी, भाकरी, ठेचा, चटणी, भात अशा ग्रामीण व साध्या घरगुती जेवणाचा मेनू काल अजित पवारांसाठी होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही हे कुटुंब १९९९ नंतरही पवारांबरोबरच राहिले. दरम्यान, दिघीसह १४ गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९७ मध्ये झाला. तत्पूर्वी वडिलानंतर १९९५ ला चंद्रकांत दिघीचे उपसरपंच झाले होते. पालिकेत समावेश झाल्यावर त्यांना २००९ मध्ये प्रभाग सदस्य म्हणून पक्षाने प्रथम संधी दिली. नंतर २०१२ ला नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र,२०१७ ला त्यांचा वॉर्ड ओपन महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे सध्या या कुटुंबातील कोणीही पदावर नाही.

दीघीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उदघाटनासह शहरातील इतर तीन कार्यक्रमांचा शुक्रवारी अजित पवारांचा दौरा जाहीर होताच वाळकेंनी त्यांना दौरा संपल्यावर घरी जेवणाचे निमंत्रण दिले. ते दादांनी लगेच मान्यही केले. पण, गणेशोत्सव असल्याने जेवणाचा बेत साधाच करा, असे आठवणीने सांगितले. यानंतर वाळके कुटुंब लगबगीने कामाला लागले. अतिशय अवघड, पण तेवढाच रुचकर असा मासवडीचा बेत त्यांनी केला.

पुणे जिल्ह्याची पुणे येथील विधानभवनातील कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता पिंपरी दौरा सुरु झाला. प्रथम त्यांनी निगडी येथील एका आर्किटेक्चर फर्मचे नवीन कार्यालय व त्याच भागातील ज्ञानशांती शाळेचे उदघाटन केले. नंतर पिंपरीतील औषध दुकानाची फीत कापून ते संध्याकाळी पावणेसात वाजता दिघी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिलच्या उदघाटनाला रवाना झाले. तेथे त्यांचा शहर दौरा संपला. त्यानंतर ते वाळकेंच्या घरी रात्री आठ वाजता गेले. या कुटुंबाची विचारपूस केली. तत्पूर्वी त्यांचे स्वागत या घरात शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्यावरील सहा पुस्तके भेट देऊन घरातील दोन मुलींनी केले. 

भाजपचे भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे हे सुद्धा उपस्थित 

जेवणासह तासभर वेळ त्यांनी या कुटुंबाला दिला. जेवणाच्या वेळी वाळकेंच्या घरी भाजपचे भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मात्र, रुग्णालय उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण असल्याने आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी पवारांबरोबर कसलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भोसरीतून बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे  भाजपचे दिवगंत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे आहेत. ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा आहे. दरम्यान, आपल्या नेत्याने आपला शब्द पडू न देता तासभर वेळ दिला. तसेच जे साधे घरगुती जेवण दिले ते मोठ्य़ा आवडीने खाल्ले, याबद्दल चंद्रकांत वाळके यांनी सरकारनामाशी बोलताना आनंद व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com