विजयसिंह मोहिते पाटलांनी चाचपणी केलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार

त्याला आता मूर्त रूप येत आहे.
A tourist center will be set up in the Ujani dam area
A tourist center will be set up in the Ujani dam area

इंदापूर (जि. पुणे) : उजनी धरण जलाशयाचा निसर्गरम्य परिसर हा बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत आहे. सुमारे ४३ हेक्टर क्षेत्रावर हे पर्यटन केंद्र उभा करण्याच्या गतिमान हालचाली सुरू आहेत. त्यासाठी सहा कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे कृषीधवल, सहकार, औद्योगिक क्रांतीनंतर उजनी धरण परिसर पर्यटन केंद्र म्हणून परिसराचे अर्थकारण मजबूत करण्यास योगदान देणार आहे. (A tourist center will be set up in the Ujani dam area)

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील पर्यटनमंत्री असताना त्यांनी उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्र उभारण्याबाबत चाचपणी केली होती. मात्र, धरणाच्या सुरक्षेच्या कारणावरून तो प्रकल्प बारगळला होता. त्याला आता मूर्त रूप येत आहे.

पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या उजनी जलाशयात पाण्याचा मृतसाठा हा ६३ टीएमसी इतका असल्याने येथे सतत पाणी असते. त्यामुळे जलाशयावर पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. येथे फ्लेमिंगो, चित्रबलाक यांसह ३५० हून अधिक देशी, विदेशी पक्षी प्रतिवर्षी आपले सारंगगार फुलवण्यासाठी येतात. त्यांच्या नयन मनोहारी कवायती पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरतात.  जलाशयात मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध असल्याने पक्षी या जलाशयाकडे आकर्षित होतात. उजनी जलाशय व पाणलोट क्षेत्रात सैराटसह अनेक चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पर्यटन व जलवाहतूक सुविधा  उपलब्ध करून दिल्यास अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

उजनी जलाशयावर (यशवंत सागर) वृंदावन गार्डनच्या धर्तीवर पर्यटन केंद्र उभारण्याची तसेच जल वाहतुकीची संकल्पना धरणाचे माजी अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी अनेक वर्षांपूर्वी मांडली होती. आघाडी सरकारच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पर्यटन खाते असताना याबाबतची चाचपणी झाली होती. अधिकाऱ्यांनी जलाशयाची पाहणी करून याबाबतचा अहवालही तयार केला होता. मात्र, नंतर त्यास धरण सुरक्षितेतच्या कारणावरून ब्रेक मिळाला होता. त्यानंतर उजनी जलाशयावर सर्वात मोठा सोलर प्रकल्प राबविण्याची तयारी फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आली होती. तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख हेदेखील त्यासाठी आग्रही होते. नंतर तीही योजना गुंडाळण्यात आली होती. 

आता महाराष्ट्र विकास महामंडळाच्या मदतीने वन विभागामार्फत बीओटी तत्त्वावर पर्यटन केंद्र विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्र उभारण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. उजनी धरणासाठी यापूर्वी १०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून एकूण जमिनीपैकी ४३ हेक्टर जमिनीवर हे पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. 

या पर्यटन केंद्रात बोटिंग, पक्षी निरीक्षण केंद्र, मनोरंजनाची साधने व अन्य बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्रासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून जिल्हा नियोजन समितीमधूनही निधी उपलब्ध होणार आहे. पर्यटन केंद्र सज्ज झाल्यानंतर ते बीओटी तत्त्वावर देण्यात येणार आहे.

या पर्यटन केंद्रामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतील. त्यानंतर त्या परिसरात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच संबंधीत अधिकाऱ्यांनी यापूर्वी उजनी जलाशयाची पाहणीदेखील केली आहे. त्यामुळे भविष्यात उजनी जलाशय पर्यटन केंद्र म्हणून देखील वरदान ठरणार आहे, हे निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com