आमदार राऊतांच्या एकहाती सत्तेला सोपल-मिरगणे-आंधळकर एकत्र येऊन लावणार सुरूंग

आमदार राजेंद्र राऊत त्यांना जिद्दीने विरोध करुन सत्ताकेंद्रे काबीज केली आहेत.
Sopal, Mirgane and Andhalkar will come together to break the dominance of MLA Raut
Sopal, Mirgane and Andhalkar will come together to break the dominance of MLA Raut

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सत्ता केंद्रे ताब्यात असलेल्या आमदार राजेंद्र राऊत यांना शह देण्यासाठी माजी मंत्री दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर एकत्र येऊन लढा देणार आहेत. दरम्यान, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा बार्शी शहर अन् तालुक्यात रंगली आहे. (Sopal, Mirgane and Andhalkar will come together to break the dominance of MLA Raut)
   
बार्शी शहर अन् तालुक्याचे राजकारण पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठ असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांनी 1985 पासून 2019 पर्यंत  स्वत:चा एकगठ्ठा मतदार आजही शाबूत असल्याचे दाखवून दिले आहे, तर आमदार राजेंद्र राऊत त्यांना जिद्दीने विरोध करुन सत्ताकेंद्रे काबीज केली आहेत. नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायती अशा होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये माजी मंत्री सोपल विरुद्ध विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटातच लढत होताना दिसली आहे.

हेही वाचा : आमदार राऊत गटाचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले राष्ट्रवादीच्या वाटेवर 
 
सद्य परिस्थितीत आमदार राजेंद्र राऊत यांच्या ताब्यात सर्व सत्तास्थाने आहेत. त्यांच्या विजयाच्या वारुला ब्रेक लावून आपला गट, पक्षाचे महत्व, कार्यकर्त्यांना उभारी आणण्यासाठी नगरपरिषद निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये; म्हणून सोपल-मिरगणे-आंधळकर असे तिघे जण एकत्र येऊन लढा देणार, यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.

नगरपरिषदेची दहा वर्षे ताब्यात असलेली सोपल यांची सत्ता मागील निवडणूकीत आमदार राऊत यांनी संपुष्टात आणली. पण, गेली चार वर्षे पूर्ण होऊनही शहरातील रस्ते अन् पाणी पुरवठा प्रश्न योग्यरितीने हाताळू शकले नाहीत. नागरिकांमध्ये समाधानाची भावना नाही, या मुद्यावर विरोधक तयारीला लागले आहेत.

मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने शहर अन् तालुक्याला ग्रासले आहे. शासकीय निधींचा अडथळा निर्माण झाला तरीही आमदार राऊत यांनी या कालावधीत प्रशासनाला धारेवर धरुन, जनतेच्या आरोग्य व स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. ऑक्सिजन पुरवठा, बेडची व्यवस्था यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, ही आमदार राऊतांची जमेची बाजू आहे. शहरात सुरु असलेली विकासकामे, उद्यानाचे सुशोभिकरण विरोधकांना पहावत नाही. जुनी झालेली उजनी जलाशयाची पाईपलाईन अन् त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे, असा निर्वाळा प्रशासन अन् सत्ताधारी सदस्यांकडून दिला जात आहे.

 
नुकत्याच झालेल्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही सुपुत्रांच्या विवाहप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व विरोधी पक्षातील नेतेमंडळींनी लावलेली हजेरी ही आमदार राऊत यांनी राजकीय ताकद दाखवून देणारी आहे. भाजपवासी झालेले आमदार राजेंद्र राऊत यांनी नगरपरिषद निवडणूक लढवण्यास सज्ज असून प्रत्येक वॉर्डमध्ये आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवली आहे. राजकीयद्दष्ट्या फक्त सोपलच आपले विरोधक असून इतरांचा काहींही प्रभाव आपल्यावर पडणार नाही, असेही राऊत यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

....तर आमदार राऊतांना बसणार धक्का

बार्शी नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शहरात सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याच अनुषंगाने माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा बार्शी शहर अन् तालुक्यात रंगली आहे. बारबोले हे सध्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या गोटात असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास राऊत यांची राजकीय ताकद कमी करणारे ठरणार आहे. कारण, बार्शी शहरात बारबोले गट आपली ताकद राखून आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com