मोहिते पाटलांच्या लढाईला यश; अकलूज नगरपरिषदेची अधिसूचना निघाली

राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची प्रश्न प्रलंबित होता.
Success in the battle of Mohite Patil; Akluj Municipal Council notification issued
Success in the battle of Mohite Patil; Akluj Municipal Council notification issued

नातेपुते (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना राज्य सरकारचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या सहीनिशी काढली. तीन आठवड्यांत अध्यादेश काढावा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १७ जुलै रोजी दिला होता. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या लढाईला अखेर यश मिळाले असून अकलूज माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांचा विजय झाला आहे. (Success in the battle of Mohite Patil; Akluj Municipal Council notification issued)

याबाबतची माहिती अशी की, अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतसंदर्भात ता. ११ सप्टेंबर २०१९ रोजी पहिला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची प्रश्न प्रलंबित होता.

अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेस न्याय मिळाला आहे. हा प्रश्न सहमतीने सुटावा, यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून विनंतीही केली होती.

डिनर डिप्लोपसी आणि उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीचा प्रश्न आज मार्गी लागला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी गेली ४३ दिवस अकलूज येथे प्रांत कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू होते. उपोषणस्थळी प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला होता. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला आहे.

अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना निघाली, हे वृत्त समजताच अकलूज, नातेपुते ,माळेवाडी येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नेतेमंडळींनी एकमेकांना फोन करून शुभेच्छा दिल्या. भावी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि त्यांचे समर्थक फटाक्यांची आतषबाजी करीत आहेत. माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर हे  बुधवारी (ता. ४ ऑगस्ट) अकलूज नगरपरिषदेचे प्रशासक म्हणून सुत्रे होती घेतील. त्यामुळे विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना फक्त ६ महिने काम करण्यास मिळाले आहेत. नव्याने प्रभाग रचना होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. एकूणच माळशिरस तालुक्यात राज्य सरकारच्या या अधिसूचनेमुळे आनंदाचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गात पेढे वाटून आनंद व्यक्त करीत आहेत.

शिवसेनेचे शिष्टमंडळ मुंबईत तळ ठोकून

अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायत होण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मागील तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आणि तसे पत्र शिष्टमंडळास नगर विकास मंत्री यांनी दिले. या शिष्टमंडळात शिवसेनेचे धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, दत्ता पवार, नामदेव वाघमारे, प्रमोद अण्णा कुलकर्णी यांचा समावेश होता. आज सायंकाळी नगर परिषद व नगरपंचायतीचे पत्र दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्र्यांचे आभार मानले

ठाकरे, शिंदेंचे रणजितसिंहांनी मानले आभार 

विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या संदर्भातील सर्व पूर्तता झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर सरकार बदलले व हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. तो आज (ता. ३ ऑगस्ट) निकाली निघाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. या निर्णयाचा पाठपुरावा करण्यासाठी अकलूज, माळेवाडी, नातेपुते येथील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी मोठा पाठपुरावा केला. त्यांचा एक संघपणा व सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे, असे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com