IPS वैभव निंबाळकरांच्या तब्येतीसाठी सणसरकरांचे साकडे..

आसाम आणि मिझोराम सीमेवर काल (ता. २६) झालेल्या हिंसाचारानंतर येथील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे.
IPS Vaibhav Nimbalkar
IPS Vaibhav Nimbalkar

वालचंदनगर :  आसाम व  मिझोराम राज्याच्या सीमावरती उसळलेल्या दंगलीमध्ये इंदापूर तालुक्यातील सणसरचे भूमिपुत्र वैभव चंद्रकांत निंबाळकर गोळीबारामध्ये जखमी झाले असून त्यांची तब्बेत लवकरात लवकर बरी होण्यासाठी सणसर ग्रामस्‍थांनी साकडे घातले.
 
मूळचे सणसर गाव असलेल्या वैभव निंबाळकर यांचे शिक्षण बारामती व पुण्यामध्ये झाले. सध्या ते पुण्यात रहिवाशी असून आसाममधील काचार जिल्हाचे पोलिस अधीक्षक आहेत.आराम-मिझोराम सीमेवरती सोमवारी (ता. २६) रोजी झालेल्या  गोळीबारामध्ये त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकासह सहा पोलिसांचा मृत्यू झाला. वैभव निंबाळकर यांच्या पायाला गाेळी लागली असून ते गंभीर जखमी झाले असून  त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैभव निंबाळकर लवकर बरे होण्यासाठी सणसरकरांनी देवाला साकडे घातले असल्याची  माहिती सणसरचे सरपंच अॅड. रणजित निंबाळकर यांनी दिली.

रणजित निंबाळकर यांनी सांगितले की वैभव  हे धाडसी आहेत. सर्वात तरुण अधिकारी असून त्यांच्या कार्याचे नेहमीच सणसर गावामध्ये व परीसरामध्ये कौतुक होते. त्यांच्यावर आलेले मोठे संकट टळले असून लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करीत आहेत.  तसेच त्यांची बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकर, खासदार सुप्रिया सुळे  यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत या घटनेची माहिती दिली. लवकर बरे व्हा, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर लवकर बरे होण्याची पोस्ट केली आहे.

परिस्थिती तणापूर्व, पण नियंत्रणात

गुवाहाटी : आसाम आणि मिझोराम सीमेवर काल (ता. २६) झालेल्या हिंसाचारानंतर येथील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. सीमेवरील काही गावांमध्ये नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. वातावरणात तणाव असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आसाम सरकारने सांगितले आहे.

या सीमेवरील हिंसाचारात सहा पोलिसांचा मृत्यू झाल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी सांगितले होते. मात्र, पाच पोलिस आणि एका सामान्य नागरिक हिंसाचारात मृत्युमुखी पडल्याचे आज स्पष्ट करण्यात आले.

हिंसाचारात पोलिस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह ६० जण जखमी झाले आहेत. निंबाळकर यांना उपचारासाठी हवाई दलाच्या एअर अॅम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले आहे. सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले. ते या भागाला भेटही देण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीमेवरील काबूगंग आणि धोलाई गावातील लोकांनी मिझोरामकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर आज रास्ता रोको आंदोलन केले. मिझोरामची आर्थिक नाकाबंदी करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. बराक खोऱ्यात उद्या (ता. २८) एक दिवसाचा ‘बंद’ही जाहीर करण्यात आला आहे. सीमेवरील संघर्षात दोन्हीकडे तैनात असलेल्या ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी योग्य हस्तक्षेप न केल्याची टीका होत असली तरी या जवानांमुळेच परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सीमेवरील हिंसाचारात पोलिसांचा मृत्यू झाल्याबद्दल मिझोराम सरकारने आसाम सरकारची माफी मागायला हवी, अशी मागणी आसाममधील भाजपचे खासदार दिलीप सैकिया यांनी केली आहे. पोलिसांच्या मृत्यूचा आनंद मिझोरामचे नागरिक व्यक्त करत होते, हा राक्षसी प्रकार आहे, अशी टीकाही सैकिया यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com