राष्ट्रवादीतून आलेल्या सत्तातूर टोळीमुळे भाजप बदनाम 

या प्रकारामुळे भाजपचे मूळ, जुने कार्यकर्ते, नेत्यांना अतिव दु:ख, वेतना होत आहेत.
Shiv Sena MP Shrirang Barne criticizes BJP
Shiv Sena MP Shrirang Barne criticizes BJP

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेल्या सत्तातूर टोळीमुळे भाजप पुरता बदनाम झाला आहे. ते भ्रष्टाचारातून तुंबड्या भरणे, हा एकमेव कार्यक्रम राबवित असल्याने भाजपच्या नाकीनऊ आले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी (ता. २० ऑगस्ट) येथे केली (Shiv Sena MP Shrirang Barne criticizes BJP)

ना खाऊंगा ना खाने दुंगा असे म्हणणाऱ्या सत्ताधारी भाजपने पिंपरी चिंचवड महापालिकेला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटल्याचा आरोप शिवसेना खासदार बारणे यांनी परवा लाचखोरीत अटक झालेले स्थायी समितीचे भाजपे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या घटनेनंतर आज केला. या प्रकारामुळे भाजपचे मूळ, जुने कार्यकर्ते, नेत्यांना अतिव दु:ख, वेतना होत आहेत. मात्र, ते हतबल आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला. 

परवाच्या घटनेनंतर आज त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारामध्ये लक्ष घालण्याची, त्यातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली. 

या वेळी खासदार बारणे म्हणाले की, पिंपरी पालिकेत सत्तेच्या जोरावर भ्रष्टाचाराचा नंगानाच भाजपकडून सुरु आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण पिंपरी चिंचवड शहरातील त्यांच्या नेत्यांचे आहे. ही लुटारुंची टोळी असून त्यांनी शहरवासीयांची लूट चालवलेली आहे. कोरोना काळातही त्यांनी भ्रष्टाचार करणे सोडलेले नाही. मागील साडेचार वर्षांत भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठत ना भय ना भ्रष्टाचार ही घोषणाच भ्रष्टाचाराच्या खाईत लोटून दिली आहे. महापालिका अधिकारी व सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी हे स्वतःच ठेकेदाराच्या नावावर टेंडर घेऊन पालिकेला लुटत आहेत, असा आरोपही बारणे यांनी केला..

स्थायी समिती बरखास्तीची शिवसेनेची मागणी
 
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून शिवसेनेने आता भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने आज (ता.२० ऑगस्ट) पालिकेसमोर निदर्शने करीत स्थायी समिती बरखास्तीची मागणी केली आहे. विशेष स्थायी समितीत शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचेही सदस्य आहेत.

स्थायीच्या १६ सदस्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय,अशा घोषणा देत शिवसेनेने पालिकेच्या प्रवेशद्वारावर आज आंदोलन केले. याद्वारे त्यांनी आपल्या स्थायीतील सदस्या मीनल यादव यांनाही सोडले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या या महिला सदस्याच्या नियुक्तीवरून शिवसेनेत मोठी उलथापालथ झालेली आहे. त्यांचे गटनेते राहुल कलाटे यांचा राजीनामा पक्षाने घेतला आहे. पक्षाचा आदेश डावलून आपल्या मर्जीतील सदस्याची (मीनल यादव) नेमणूक स्थायीवर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मात्र, कलाटेंसारख्याचा अपवाद वगळता गेली साडेचार वर्षे विरोधी पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीच्याही सदस्यांनी स्थायीच्या बैठकांमध्ये सूचक मौन बाळगणेच पसंत केल्याचे दिसून आले आहे. मलईदार विषयांना त्यांनी कधीच विरोध केला नाही. वादाच्या विषयांवर चर्चाही केली नाही. आता मात्र महापालिका निवडणूक जवळ आल्याने या पक्षांच्या स्थानिक नेत्यांना स्थायीतील भ्रष्टाचार व टक्केवारी दिसली आहे. त्यामुळे भाजपच्या जोडीने त्यांच्याही सदस्यांची साथ या टक्केवारीत आहे, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com