भाजपच्या कारभाऱ्यांनी शहराची उत्तर-दक्षिण वाटणी करत मलिदा लाटला : शिवसेनेचा हल्लाबोल

त्यांनी आजपालिकेसमोर निदर्शने करीत स्थायी समिती बरखास्तीची मागणी केली.
भाजपच्या कारभाऱ्यांनी शहराची उत्तर-दक्षिण वाटणी करत मलिदा लाटला : शिवसेनेचा हल्लाबोल
Shiv Sena's agitation against BJP in Pimpri

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे हे लाचखोरीत नुकतेच (ता. १८ ऑगस्ट) पकडले गेल्यानंतर विरोधकांना हत्तीचे बळ आले आहे. राष्ट्रवादीनंतर जागी झालेली शिवसेनाही आता भाजपविरुद्ध मैदानात उतरली आहे. त्यांनी आज (ता.२० ऑगस्ट) पालिकेसमोर निदर्शने करीत स्थायी समिती बरखास्तीची मागणी केली. विशेष म्हणजे टक्केवारी व भ्रष्टाचाराचा आरोप नाही, तर एसीबीच्या कारवाईने तो सिद्धही झालेल्या स्थायी समितीत शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचेही सदस्य आहेत. (Shiv Sena's agitation against BJP in Pimpri)

स्थायीच्या १६ सदस्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय,अशा घोषणा देत शिवसेनेने पालिकेच्या प्रवेशद्वारावर आज आंदोलन केले. याद्वारे त्यांनी आपल्या स्थायीतील सदस्या मीनल यादव यांनाही सोडले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या या महिला सदस्याच्या नियुक्तीवरून शिवसेनेत मोठी उलथापालथ झालेली आहे. त्यांचे गटनेते राहुल कलाटे यांचा राजीनामा पक्षाने घेतला आहे. पक्षाचा आदेश डावलून आपल्या मर्जीतील सदस्याची (मीनल यादव) नेमणूक स्थायीवर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, कलाटेंसारख्याचा अपवाद वगळता गेली साडेचार वर्षे विरोधी पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीच्याही सदस्यांनी स्थायीच्या बैठकांमध्ये सूचक मौन बाळगणेच पसंत केल्याचे दिसून आले आहे.

मलईदार विषयांना त्यांनी कधीच विरोध केला नाही. वादाच्या विषयांवर चर्चाही केली नाही. आता मात्र महापालिका निवडणूक जवळ आल्याने या पक्षांच्या स्थानिक नेत्यांना स्थायीतील भ्रष्टाचार व टक्केवारी दिसली आहे. त्यामुळे भाजपच्या जोडीने त्यांच्याही सदस्यांची साथ या टक्केवारीत आहे, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

भाजप ही भ्रष्टाचारी पार्टी झाली असून त्यांनी गेल्या साडेचार वर्षांत जनतेच्या पैशाची लूट केली आहे. त्यामुळे त्यांच्या या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी निदशर्नानंतर सांगितले. परवाच्या घटनेत तर स्थायी समितीचे अध्यक्षच लाचखोरीत पकडले गेल्याने शहराची राज्यात नाही, तर देशातही बदनामी झाली आहे. भाजपच्या भय व भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभाराचे वाभाडे निघाले आहेत, असेही ते म्हणाले.

भाजप नेत्यांनी शहराचे दक्षिण-उत्तर संस्थान विभागून घेत तिजोरीतील नागरिकांच्या पैशावर दरोडा टाकला आहे. भय आणि भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक कारभारात ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’चे आश्वासन देऊन भाजपने सत्ता मिळवली. मात्र, स्थायी समितीत पहिल्या वर्षापासून दहा ते बारा टक्के घेवून शहरातील विकासकामांचा खेळखंडोबा केला आहे. ठेकेदारांना त्रास देऊन विकासकामे निकृष्ट दर्जांची कामे करण्यास भाग पाडले.

भाजप पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारुन स्वतःच्या तुंबड्या भरण्याचेच काम केले. भ्रष्ट कारभारातून बेहिशोबी मालमत्ता गोळा केली आहे. मनमानी पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविल्या आहे. करोडो रुपयाची कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना दिली आहेत. निविदांमध्ये रिंग करुन नातेवाईकांना कामे दिली. काही कामे थेट पद्धतीने देवून मलिदा लाटला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप महापालिका चाटून पुसून खाण्यासाठीच सत्तेत आल्याचे दिसून आले आहे, असा आरोप अॅड. भोसले यांनी केला. 

भाजपने स्मार्ट सिटी प्रकल्पातही स्मार्ट दरोडा टाकण्याचे काम केले. तेथेही शेकडो कोटींचा महाघोटाळा केला आहे. त्यात भाजप कारभाऱ्यांनी हात धुवून घेतला आहे, त्यामुळे भाजप आणि भ्रष्टाचार जणू समीकरणच बनले आहे. कारण त्यांनी कचरा निविदा प्रक्रियेत रिंग करुन शहराची उत्तर-दक्षिण अशी कारभाऱ्यांनी वाटणी करत भ्रष्टाचार केला. रस्ते साफसफाईच्या कामात मर्जीतील ठेकेदारांना कामे देत भ्रष्टाचार केला.

पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचार केला. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, ४२०  कोटीच्या रस्ते कामात, कचरा डेपोतील बायोमायनिंगमध्येसुद्धा त्यांनी झोल केला आहे. सिमेंट रस्त्यांच्या कामात झोल, शीतलबाग पादचारी पुलाचा झोल, एसटीपी प्रकल्पात झोल, झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पात झोल, अशी पालिकेतील भाजपच्या कथित गैरव्यवहाराची जंत्रीच शिवसेना शहरप्रमुख भोसले यांनी सादर केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in