आयुक्त कृष्णप्रकाश यांचा दणका : हफ्तेखोर PSI ला दाखवला घरचा रस्ता 

रजेवर असूनही पोलिस गणवेशात जाऊन त्याने पैसे मागितले होते.
आयुक्त कृष्णप्रकाश यांचा दणका : हफ्तेखोर PSI ला दाखवला घरचा रस्ता 
Corrupt PSI suspended by Commissioner Krishnaprakash

पिंपरी : आजारपणाच्या रजेवर असतानाही मिलन कुरकुटे या फौजदाराने (पीएसआय) एका हॉटेल चालकाकडे हफ्ता मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी कुरकुटे या पीएसआयला निलंबित करीत थेट घरचा रस्ता दाखवला. फौजदार कुरकुटे याला खात्यातून बडतर्फ करण्याची तयारी आता आयुक्तांनी सुरू केली आहे. (Corrupt PSI suspended by Commissioner Krishnaprakash)

पिंपरी-चिंचवड पोलिस नियंत्रण कक्षात नियुक्ती असलेल्या मिलनने पुणे पोलिस आयुक्तालयातील मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाऊन हा प्रकार केला आहे. विशेष बाब म्हणजे रजेवर असूनही पोलिस गणवेशात जाऊन त्याने पैसे मागितले होते. हफ्ता तथा लाचखोरीची त्याला चटकच लागलेली होती. कारण गेल्या वर्षी हिंजवडी पोलिस ठाण्यात नियुक्तीवर असताना त्याला लाच घेताना पकडण्यात आले होते. तेव्हा त्याला त्यावेळचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी निलंबित केले होते.

निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर फौजदार कुरकुटे याला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. तेव्हापासून तो कंट्रोल रुमला अटॅच होता. तेथे त्याने २४ तारखेपासून आजारपणाची रजा घेतली होती. रजेवर असतानाच काल (ता. २४) तो पुण्यातील कार्निवल हॉटेलात ड्रेसवर गेला होता. मालक व व्यवस्थापकाशी हुज्जत घालून त्याने पैशाची मागणी केली होती. याबाबत मुंढवा पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना कळवले. त्याची तातडीने आयुक्तांनी गंभीर दखल घेत मिलन कुरकुटे याला आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसेच, आता त्याला बडतर्फीचा बडगा दाखवण्याची कार्यवाहीही सुरु करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम सुरु करून पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी अल्पावधीतच शहरातील गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले आहे. बेकायदेशीर धंद्यांना अभय देणारे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही ते सोडत नाहीत. अशांना साइड पोस्टिंग किंवा प्रसंगी निलंबनाचा बडगासुद्धा ते दाखवित आहेत. चांगले काम करणारे कर्मचाऱ्यांना बक्षीस देऊन त्यांचे मनोधैर्यही उंचावण्याचे कामही आयुक्तांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in