एकनाथजी, पुढच्या कार्यक्रमाची तारीख घेण्यापूर्वी प्रतापला किती निधी पाहिजे, हे विचारून घ्या 

पण तुम्ही (मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून) समोर आले की परत त्याची आठवण करून देतात.
Ask MLA Pratap Saranaik how much funding he wants : Uddhav Thackeray
Ask MLA Pratap Saranaik how much funding he wants : Uddhav Thackeray

ठाणे : ‘एकनाथजी, आता पुढच्या वेळच्या कार्यक्रमाची तारीख प्रतापने देण्यापूर्वी त्यांना काय काय निधी पाहिजे, ते आधी समजून घ्या. नाहीतर प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणता तसे कार्यक्रमात निधी मागतात. पण ते निधी चांगल्या कामासाठी मागतात, त्यामुळे निधी द्यायला काही हरकत नाही’ अशा शब्दांत आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीच्या मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सूचना केली. (Ask MLA Pratap Saranaik how much funding he wants : Uddhav Thackeray) 

प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. त्याचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. ऑक्सिजन, कार्डियाक रुग्णवाहिका, कर्करुग्णनिदान रुग्णवाहिकेची सुविधा जनतेसाठी २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या शिवसैनिकांना आर्थिक मदतही आमदार सरनाईक यांच्या वतीने देण्यात आली. 

आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांचे फाउंडेशन आणि प्रतिष्ठानकडून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, ठाणे शहरात काही पादचारी पूल आम्ही मंजूर केले आहेत. पण त्याचे काम निधीअभावी अजून चालू झालेले नाही. तलावाचे सुशोभीकरण रखडलेले आहे. राज्य सरकारकडून आम्हाला निधी मिळावा, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

त्यावर ठाण्याचे पालकमंत्री शिंदे म्हणाले की, ऑक्सिजनची गरज ओळखून महापालिकेच्या वतीने प्लांट उभारण्यात आले. महापालिका आणि राज्य सरकारच्या वतीने ही सेवा देण्यात येत आहे. पण, आमदार सरनाईक यांनी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिरा भाईंदर आणि ठाणे शहरात दोन ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. सरनाईक विविध उपक्रम राबवत असतात आणि निधीदेखील ते सारखे मागत असतात. मीही त्यांना निधी देत असतो. पण तुम्ही (मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून) समोर आले की परत त्याची आठवण करून देतात. सर्वात अधिक निधी सरनाईक यांनीच माझ्याकडून घेतला आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, आमदार प्रताप सरनाईक हे निधी चांगल्या कामासाठी मागतात, त्यामुळे निधी द्यायला काही हरकत नाही. चांगल्या कामासाठी लागणारा कोणचाही निधी अडवलेला नाही. जेणेकरून लोकोपयोगी कामे होत राहतील आणि जनतेचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. नुसतं बोंबलून आशीर्वाद मिळत नसतो.’

मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही काही लोक हट्टाने दहीहंडीचा कार्यक्रम सार्वनिकरित्या करताना दिसत आहे. त्या लोकांसाठी हा प्लांट आहे. आंदोलन करून जे लोक रुग्णालयात जाणार आहेत, त्यांच्यासाठी हा प्लांट आहे. सरकारच्या बरोबरीने शिवसेनेचे मंत्री, आमदार, नगरसेवक आणि शिवसैनिक हे समांतर यंत्रणा राबवून या कामात मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करत आहेत. याच कामामुळे आपल्या राज्यात ऑक्सिजनअभावी एकाचाही मृत्यू झाला नाही. सरकार, सरनाईकांसारखे आमदार ह्यांचे यामध्ये योगदान आहे. मुंबईच्या तोडीस तोड काम ठाणे शहरात झाले आहे. सामाजिक कामाचे मोठे गोठोडे तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे तुमच्यावर अशी किती संकटे आली तरी आपण त्याच्याशी सामना करू शकतो आहे, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com