मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सरकारी विमानात बसल्यानंतर, परवानगी नाही. असे सांगितले गेले, त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या राज्यपालांच्या जवळच्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या मदतनीसांशी संपर्क साधताच सरकारी विमान हवे असेल तर अधुनमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्क ठेवत जा, असा निरोप देण्यात असल्याचे समजते. या प्रकरणाची जोरदार चर्चा राज्यात सुरु आहे.
विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी सरकाने १२ सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवली होती, ती मंजूर न केल्याने राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील शीतयुद्धाची चर्चा सुरु होती. मात्र, आज अशा पध्दतीने विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरवणे हा अत्यंत आक्षेपार्ह प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
प्रकरण काय?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरूवारी शासकीय विमान नाकारण्यात आल्याचे समोर आले. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचे समजल्यानंतर ते पुन्हा खाली उतरले. व खाजगी विमानाने ते डेहराडूनला रवाना झाले.
हे ही वाचा...
बच्चू कडू म्हणाले, राज्यपाल तर भाजपचे प्रवक्ते !
राज्यपालांना विमान हवे असल्याचे २ फेब्रुवारीलाच कळवले होते
मसुरी येथे आयएएस प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमासाठी आज राज्यपाल निघाले होते. नियोजनानुसार त्यांनी आधीपासूनच विमानाची नोंदणी केली होती, असे सांगितले जात आहे. त्यानुसार राज्यपाल विमानात जाऊन बसलेही. जवळपास 20 मिनिटे बसल्यानंतर त्यांच्या विमानाला सरकारची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना खाजगी विमानाने जावे लागले.
अजित पवार म्हणाले, विमान नाकारल्याचे माहित नाही
राज्यपालांना शासकीय विमान नाकारल्याबाबत माहिती नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मंत्रालयात गेल्यानंतर याबाबत माहिती घेऊ, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजप नेते सुधीर मनगंटीवार, गिरीश महाजन यांनी राज्यपालांना विमान नाकारल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
...तर भाजपनं आपलं विमान राज्यपालांना द्यायला हवं होतं
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारण्याच्या प्रकरणाशी भाजपचा काय संबंध आहे. भाजपला एवढंच वाईट होते, तर भाजपने त्यांचं विमान राज्यपालांना द्यायला पाहिजे होते. भाजपकडे खूप कमर्शियल विमानं आहेत. कोश्यारीसाहेब हे भाजपचेच नेते आहेत. अलीकडे राजभवनामध्ये राज्यापेक्षा भाजपचीच पक्षकार्ये जास्त चालतात, अशी लोकांची भावना आहे. राज्यपालांचा अपमान व्हावा, अशा प्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार अणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार नाहीत आणि त्यांनी ते केलं नाही, अशा शब्दांत कोश्यारी यांना डेहराडूनला जाण्यासाठी राज्य सरकारने विमान नाकारल्याच्या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.
Edited By - Amol Jaybhaye

