मुंबई : महाराष्ट्र सरकारने सरकारी विमान वापरण्याची परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना व्यावसायिक विमान कंपनीच्या विमानाचे तिकिट काढून डेहराडूनला जावे लागल्याची माहिती राजभवनच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यपालांना विमान हवे असल्याचे राजभवन सचीवालयाने २ फेब्रुवारीलाच सरकारला कळवले होते, असा खुलासा राजभवनाच्या वतीने करण्यात आला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उध्दव ठाकरे सरकारमधील वाद अनेकदा झाले आहेत. गुरूवारीही राज्यपालांना शासकीय विमान नाकारण्यात आल्याचे समोर आल्याने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचे समजल्यानंतर ते पुन्हा खाली उतरले. अखेर खाजगी विमानाने ते डेहराडूनला रवाना झाले.
ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासूनच राज्यपाल व सरकारमध्ये सातत्याने वाद होत आहेत. राज्यपालांकडून अनेकदा सरकारवर जाहीर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. मागील तीन महिन्यांपासून 12 जणांची नावे राज्यपालांकडे देऊनही अद्याप त्यावर सही झालेली नाही. त्यावरूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच नाराजीही व्यक्त केली. हा वाद थांबताना दिसत नाही.
राज्यपाल मुंबई विमानतळावर ज्यावेळी विमानात बसले त्यावेळी सरकारी विमान वापरण्यासंबंधात राजभवनाकडून विनंती मिळाली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. वास्तविक उत्तराखंड येथे जाण्यासाठी विमानाची आवश्यकता असल्याची लेखी पूर्वकल्पना महाराष्ट्र सरकारला देण्यात आली होती. २ फेब्रुवारीलाच याबाबतचे पत्र देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासही याबाबत कळविण्यात आले होते, असे राजभवनच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

