बारा नावांबाबत राज्यपाल काय म्हणाले? अजितदादांनी दिली माहिती...
Uddhav Thackeray & Ajit Pawar met the Governor regarding 12 MLCs

बारा नावांबाबत राज्यपाल काय म्हणाले? अजितदादांनी दिली माहिती...

काही दिवसांपूर्वीराज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव कॅबिनेटने राज्यपालांना दिला आहे.

मुंबई : बहुप्रतिक्षित असलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची बुधवारी रात्री भेट झाली. विधान परिषदेवर नेमावयाच्या 12 नावांबाबत ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यपालांशी चर्चा केली. या भेटीबाबत अजित पवार यांनी माध्यमांना माहिती दिली. (Uddhav Thackeray & Ajit Pawar met the Governor regarding 12 MLCs)

पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव कॅबिनेटने राज्यपालांना दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याची आठवण आम्ही राज्यपालांना करून दिली आहे. याबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनावेळी विधान परिषदेत सदस्य संख्या कमी असते. त्यामुळं यावर लवकर निर्णय घेण्याची विनंती केल्याचे पवारांनी सांगितलं.

राज्यपालांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं असून लवकर योग्य निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. उच्च न्यायालयानं राज्यपालांना बारा नावांबाबत लवकर निर्णय घेण्याबाबत सुचित केलं होतं. पण त्याबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचंही पवार यांनी सांगितलं. राज्यपालांना सुरूवातीला राज्यातील पाऊस, धरणांची स्थिती तसेच इतर महत्वाच्या मुद्यांची माहिती दिल्याचे पवार यांनी नमूद केलं. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या काही नावांबाबत राज्यपालांचे आक्षेप आहेत. त्यावरून हा संघर्ष आहे. त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला कशी काय मान्यता द्यावी, असा प्रश्न राज्यपालांच्या कार्यालयासमोर आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून शिफारस करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे माजी खासदार यांच्या नावावर आक्षेप आहेत. विविध आंदोलनात शेट्टी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर फेरविचार करण्याची सूचना राज्यपाल देऊ शकतात, असे सांगण्यात आले.

कला, संगीत, साहित्य, विज्ञान, समाजसेवा अशा क्षेत्रांतील तज्ञांना विधान परिषदेवर जाण्यासाठी संधी मिळावी, यासाठी अशी नेमणूक करण्याची घटनेत तरतूद आहे. तरी अनेकदा राजकीय कार्यकर्तेच या कोट्यातून आमदार होतात. त्यामुळे अशा नियुक्त्यांसाठी काही निकष ठरवावेत का, असाही मुद्दा राज्यपाल कार्यालयाकडून उपस्थित करण्यात आला. 

या साऱ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार कडून देण्यात आलेल्या यादीतील एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांची यादीतुन नावे कट होण्याची सध्या चर्चा आहे. महाविकस आघाडी सरकारची १२ जणांची यादी पाठवली. यात राष्ट्रवादी ४, काँग्रेस ४, तर शिवसेनेच्या ४ सदस्यांच्या यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे - समाजसेवा आणि सहकार, राजू शेट्टी - सहकार आणि समाजसेवा, यशपाल भिंगे - साहित्य, आनंद शिंदे - कला तर काँग्रेसकडून रजनी पाटील - समाजसेवा आणि सहकार, सचिन सावंत - समाजसेवा आणि सहकार, मुझफ्फर हुसेन - समाजसेवा, अनिरुद्ध वनकर - कला यांची नावे पाठविण्यात आली आहेत.

शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर - कला, नितीन बानगुडे पाटील - शिवव्याख्याते, विजय करंजकर - शिवसेना नाशिक जिल्हाध्यक्ष आणि चंद्रकांत रघुवंशी - नंदुरबार (पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार) यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यपालांच्या कोणत्या सूचना ठाकरे सरकार मान्य करणार, याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. 

Related Stories

No stories found.