अनिल परबांची धावाधाव...राऊतांनंतर जयंत पाटलांच्या भेटीला

ईडीच्या नोटिशीवर या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
Transport Minister Anil Parab Meet to Jayant Patil :
Transport Minister Anil Parab Meet to Jayant Patil :

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना काल सक्तवसुली संचानलयाची (ईडी) नोटीस आली. त्यानंतर परब यांनी आज नेत्यांच्या गाठीभेटींचा धडाका लावला आहे. काही तासांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटलेले परब यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. या धावत्या भेटीतील अधिकृत माहिती समजू शकली नाही. मात्र, ईडीच्या नोटिशीवर या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. (Transport Minister Anil Parab Meet to Jayant Patil)

मनी लाँर्डिंग प्रकरणी ईडीने परिवहन मंत्री परब यांना नोटीस बजावली आहे. त्यात त्यांना येत्या त्यांना 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. परब यांना नोटीस आल्यानंतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर सोमवारी ईडीने छापेमारी केली. तसेच, अन्य दोन ठिकाणीही ईडीने छापे टाकून चौकशी सुरू केली आहे. खरमाटे यांच्यावर बदली प्रकरणात वसुली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

खरमाटे व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पैसे वसुली करून परब यांना दिले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. देशमुख यांच्यापाठोपाठ वसुली प्रकरणात विरोधकांकडून परब यांचेही नाव घेण्यात आल्यानं राज्यात खळबळ उडाली होती. पण आतापर्यंत केवळ देशमुख यांचीच चौकशी सुरू होती. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपने शिवसेनेलाही इशारा दिला होता. जयंत पाटील यांच्या भेटीबाबतचा तपशील मात्र मिळू शकला नाही.

आमचेही दिल्लीत दिवस येतील

दरम्यान, परब यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी भाजपला इशारा देत ‘आमचेही दिल्लीत दिवस येतील’ असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिवसेना नेत्यांवर काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारवाया सुरू आहेत. आम्हाला ईडीची नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही. शिवसेना हे सध्या ईडीचे लक्ष्य आहे. मात्र, त्याचा तसूभरही परिणाम राज्य सरकारवर होणार नाही. आमचे मनोधैर्य खचणार नाही उलट वाढेलच. परब कायदा क्षेत्रातले जाणकार अल्याने काय करायचे हे त्यांना माहित आहे. 

बिनबुडाचे राजकारण आणि सुडाची भावना याहून सध्या हे सगळे काय सुरू आहे. दिल्लीत आमचेही दिवस येतील, असा सूचक इशारा राऊत यांनी यावेळी दिला. तसेच, कर नाही त्याला डर कशाला, असा सवालही त्यांनी केला. काहीही झाले तरी आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, असेही राऊत म्हणाले. ईडी आणि भाजपची हातमिळवणी आहे. त्यामुळे त्याची आधी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. 


राजकीय सूडबुद्धीने कारवाई : नवाब मलिक 

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुद्धीने व राजकीय हेतूने घडतंय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे, त्यावरून नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले. 

ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होतेय. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी; परंतु ज्या पद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते, असेही मलिक यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com