सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांची आज पुण्यतिथी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या आबांचे आकस्मिक जाणे, मनाला चटका देणारे होते. आजही आबांच्या आठवणींनी अनेक जण गहिवरून जातात. त्यांच्या या स्मृतीदिनानिमित्ताने त्यांची अखेरची चिठ्ठी समोर आली आहे.
आबांनी निधनाच्या चार दिवस आधी राज्याच्या काळजीविषयी यात लिहिलेले आहे. निधनाच्या चार दिवस आधी त्यांना बोलता येत नव्हते, तरीही आबांना राज्याची काळजी होती. त्यातूनच हात सुजलेले असताना देखील त्यांनी ते जाणून घेण्यासाठी "राज्यात काय चाललंय" हे वाक्य "त्या" चिठ्ठीवर लिहिले होते. शेवटच्या क्षणापर्यंत आबांना राज्यातल्या जनतेविषयी असणारी काळजी चिठ्ठीत लिहलेल्या त्या चार वाक्यातून दिसते, अशी भानवा त्यांच्या कन्या स्मिता आणि चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केली. त्यांनी फेसबुक पेजवरून आबांच्या हस्ताक्षरातील ही चिठ्ठी पोस्ट करत आबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रामराजे-उदयनराजेंच्या तलवारी खरंच म्यानात राहतील का?
स्मिता यांनी लिहिले आहे की, "बोलू शकत नसल्यामुळे निधनापूर्वी चार दिवस आधी हाताला सूज असताना लिहीलेले आर. आर. आबांचे हे शेवटचे शब्द होते. राज्यात काय चाललंय? शेवटपर्यंत लोकांचा विचार करणार्या आर. आर. आबांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!" रोहित याने लिहिले आहे की, देवाने देव चोरला! देवा तुला शोधू कुठं?
तासगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून आबांनी तब्बल 24 वर्षे त्यांनी नेतृत्व केले. राज्याचे गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही भूषवलेल्या आबांनी आपल्या शांत आणि सभ्य व्यक्तिमत्वाने जनतेच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी लीलावती रुग्णालयात कॅन्सरने त्यांचे निधन झाले होते.
एक एमबीबीएस डॅाक्टर जेव्हा आयपीएस बनून ठसा उमटवतो तेव्हा...
त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगली जिल्ह्यात तासगांव तालुक्यातल्या अंजनी या गावी झाला होता. त्यांचे वडील गावचे सरपंच असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची होती. त्यामुळे त्यांनी ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत काम करत करत शिक्षण पूर्ण केले होते. सांगलीच्या शांतिनिकेतन कॉलेजमधून त्यांनी बी.ए. आणि एलएलबीचे शिक्षण घेलले होते.
सांगली जिल्हा परिषदेचे सभासद असलेले आबा तासगांव मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये सलग विधानसभेवर निवडून गेले. आपल्या कार्यकाळात त्यांनी ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळला. पक्षाच्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. गृहमंत्री असताना त्यांनी नक्षलवादाचा सामना करण्यासाठी उचललेली पावले महत्वपूर्ण होती. आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि ‘गाडगेबाबा स्वच्छता अभियान’ ‘तंटामुक्त गाव’ यासारख्या योजनांमुळे ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले होते.
Edited By - Amol Jaybhaye

