Will Ramraje and Udayanraje forget past differences and move on | Sarkarnama

रामराजे-उदयनराजेंच्या तलवारी खरंच म्यानात राहतील का?

रामराजे-उदयनराजेंच्या तलवारी खरंच म्यानात राहतील का?

उमेश बांबरे
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

रामराजे-उदयनराजेंमधील वाद ज्या सर्किट हाऊसवर सुरू झाला, त्याच ठिकाणी तो मिटला! 

सातारा : "रामराजेंच्या वयाचा विचार करून थांबलो, त्यांच्या जागी अन्य कोणी असते तर जीभ हासडली असती,' असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी दीड वर्षापूर्वी मुंबईतील समझोता बैठकीनंतर केले होते. 

रामराजे-उदयनराजे यांच्यात समेट घडविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही बैठक घेतली होती. या घटनेला दीड वर्षे पूर्ण झाले असतील. पण, शनिवारी (ता. 31 ऑक्टोबर) अचानकपणे साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात उदयनराजे यांनी रामराजेंची भेट घेतली. एकमेकांशी दिलखुलास चर्चा करून "टेक केअर.' चा सल्लाही दिला. या दोन राजांमधील वाद मिटून ते पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. हा वाद मिटेल, असे कोणालाही वाटत नाही. साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्याच विश्रामगृहात शनिवारी या राजांमधील मनोमिलनाची झलक पहायला मिळाली. दुसऱ्यांदा हे दोन राजे विश्रामगृहात एकमेकांना भेटले. 

शरद पवारांचे प्रयत्न वायफळ 

रामराजे व उदयनराजे या दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न खुद्द शरद पवारांनी केला होता. त्यावेळी झालेल्या बैठकीतून उदयनराजे संतप्त होऊन बाहेर आले व त्यांनी मीडियाशी बोलताना, "मी त्यांच्या वयाचा आदर करतो, दुसरे कोणी असते, तर त्यांची जीभ हासडली असती,'' अशा शब्दांत आपला राग व्यक्त केला होता. त्यातून त्यांचा रामराजेंवर किती राग आहे, हे स्पष्ट होते. 

अन् उदयनराजे विश्रामगृहात शिरले 

साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात एकदा रामराजे मुक्कामी असताना उदयनराजे त्याठिकाणी आले. "बघतोच..., फाडतोच...' असे म्हणत विश्रामगृहात शिरले होते. त्यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना बाहेरच अडविले होते. त्यामुळे पुढील घटना टळली होती. त्यानंतरही या दोन्ही राजांमधील वाद अधूनमधून उफाळून येतच होता. 

सोना अलाइन्स कंपनीतील कामगारांवरून वादाला सुरुवात 

रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद सुरू झाला, तो खंडाळ्यातील सोना अलाइन्स कंपनीतील कामगार संघटनेतून. या कंपनीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून कर्मचारी पुरविले जात होते. या कंपनीत उदयनराजेंनी हस्तक्षेप केला. तसेच, कंपनीच्या मालकाला तथाकथित खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजे व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला होता. या सर्व प्रकाराला रामराजे हेच जबाबदार असल्याचे समजून त्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. 

हे स्वयंघोषित छत्रपती 

बारामतीच्या पाण्यावरून शरद पवारांवर टीका करणाऱ्या उदयनराजेंना उत्तर देताना रामराजेंनी "सगळी संस्थाने खालसा असताना कोणी छत्रपती लावतं का,' असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, "आताचे छत्रपती हे स्वयंघोषित असून लोक छत्रपती म्हणतात म्हणून त्यांना आम्ही छत्रपती म्हणतो. ते छत्रपतींचे वंशज आहेत, त्यांनी छत्रपतींसारखे वागावे,' असा सल्लाही दिला होता. "तुमच्यावर खंडणीचे, खुनाचे गुन्हे आहेत. गुन्हे खरे की खोटे हे न्यायालय ठरवत असते. तुम्ही ठरवू शकत नाही. न्यायालयाचे निर्णय आपल्याला मान्य नसतील कारण आपण छत्रपतींचे वंशज आहात. हे राज्य आपले गुलाम असेल मात्र, फलटण कोणाच्या गुलामीखाली नाही,' असा इशाराही रामराजेंनी दिला होता. 

फलटणमध्ये जाऊन टीका 

पुढे हा वाद इतका विकोपाला गेला की उदयनराजे एकेदिवशी फलटणला गेले. तेथील शासकीय विश्रामगृहात जाऊन त्यांनी रामराजेंना चॅलेंज केले होते. "तुमच्या सारख्या बांडगुळांमुळे फलटण शहरात नको त्या कुत्र्यांचे फावतेय. तुमच्यापैकी एकजण तयार व्हा,' असे सांगून "कुठे मालोजीराजे अन् कुठे हे...फलटणमधील एकमेव व्यक्ती ही जिल्ह्याला लागलेली किड आहे. ही किड घालवायची आहे,' अशी टीका केली होती. 

ते माझे नाव घेऊन टीका करत असतील तर माझेही चॅलेंज स्वीकारा. तुमच्या फलटण शहरात आलोय. तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही, असा सज्जड दमही उदयनराजे यांनी रामराजेंचे नाव न घेता दिला होता. त्यानंतर दोघेही सातत्याने एकमेकांवर आरोप करत होते. या वादातूनच पुढे लोकसभेला साताऱ्यातून उदयनराजेंना तिकिट देऊ नये, असा मुद्दा पुढे आला. 

शिवेंद्रसिंहराजेंच्या सुरूची बंगल्यावर राडा 

बारामती येथे जाऊन "शरद पवार यांनी उदयनराजेंना तिकिट देऊ नये,' असे रामराजेंसह राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख आमदारांनी सांगितले होते. याच दरम्यान, उदयनराजे समर्थकांच्या ताब्यातील आनेवाडी टोलनाका काढून घेऊन तो आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या समर्थकांना देण्याचा प्रयत्न झाला. यावरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्येही वाद पेटला. आमदार शिवेंद्रराजेंच्या सुरूची बंगल्यावर उदयनराजे आणि त्यांचे समर्थक चालून गेले होते. 

चुलत बंधूंमध्ये वाद 

या घटनेनंतर या दोन चुलत बंधूंमध्ये वाद सुरू झाला. रामराजे, शिवेंद्रसिंहराजे विरुद्ध उदयनराजे असे वादाचे स्वरूप होते. याच दरम्यान, नाईक निंबाळकर हे साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. दुपारची वेळ होती. याच वेळी उदयनराजे विश्रामगृहात येण्यास निघाले. याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना मिळताच ते उदयनराजेंच्या आधी विश्रामगृहात पोचले. रामराजे थांबलेल्या कक्षात जाऊन पाटील थांबले. उदयनराजे विश्रामगृहात येताच पुन्हा बाहेर आले. त्यांनी उदयनराजे यांना बाहेरच्या दरवाजाजवळच अडविले आणि रामराजेंच्या कक्षाकडे जाण्यापासून रोखले. त्यानंतर उदयनराजे दुसऱ्या बाजूला असलेल्या कक्षाकडे गेले. त्यावेळी पोलिस अधीक्षकांनी त्यांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांना विश्रामगृहातून बाहेर घेऊन आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. 

तो प्रकार मी विसरलेलो नाही 

विश्रामगृहात घडलेल्या घटनेबाबत रामराजे यांनी उदयनराजेंना सूचक इशारा दिला होता. तो प्रकार मी विसरलेलो नाही. पण, मी सावज टप्प्यात येण्याची वाट पाहत आहे. सावज टप्प्यात आल्यावर योग्य वेळी मी बाण सोडणार आहे, असा इशारा रामराजेंनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून दिला होता. 

दिलखुलास गप्पा 

साताऱ्याच्या त्याच शासकीय विश्रामगृहात शनिवारी पुन्हा हे दोन राजे भेटले. पण, या वेळी त्या दोघांमध्ये दिलखुलास गप्पा झाल्या. त्या गप्पा बघून या दोन्ही राजांत वाद आहे का? असा अनेकांना प्रश्न पडला असेल. या संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीवेळी राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत रामराजे व उदयनराजे यांना दोघांतील वादाचे कारण विचारले होते. 

वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

उदयनराजे आणि माझ्यात वैयक्तीक वाद असतील. पण, त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मुळात आमच्यात वाद आहे का? ते आम्ही दोघे ठरवू, अशा शब्दांत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंसोबतच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत उदयनराजेंना विचारले असता त्यांनी त्यावेळी त्या घटनेचा आमच्या दोघांच्या मनावर ताण तणाव नव्हता. मात्र, पत्रकारांनीच ताण तणाव घेतल्याचे दिसते, असे मिश्किलपणे सांगितले होते. 

ते काय सांगतील, यावर माझी भूमिका मांडतो : रामराजे 

उदयनराजेंसोबतच्या भेटीबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना विचारले असता ते म्हणाले की, ते मला भेटायला आले होते. याबाबत त्यांनाच विचारा. ते काय सांगतील, त्यावर मी माझी भूमिका मांडतो, असे सांगून त्यांनी या भेटीला फारसे महत्व दिले नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

उदयनराजे, खासदार, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, रामराजे नाईक निंबाळकर, Ramraje Nimbalkar