pune police joint commissioner dr ravindra shisve journey from MBBS to IPS | Sarkarnama

एक एमबीबीएस डाॅक्टर जेव्हा आयपीएस बनून ठसा उमटवतो तेव्हा...

एक एमबीबीएस डाॅक्टर जेव्हा आयपीएस बनून ठसा उमटवतो तेव्हा...

उमेश घोंगडे
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

पुण्याचे पोलिस सहआयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे यांना नुकतेच राष्ट्रपती पदक जाहीर झाले. एमबीबीएस झाल्यानंतर खरे तर डाॅक्टर म्हणून रमले तरी चालले असते. पण जीवनात वेगळे करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दुसरीकडे वाचनाची प्रचंड आवड त्यांना स्पर्धा परीक्षेकडे घेऊन आली. पोलिस सेवेतही सरधोपट पद्धतीने काम केले नाही. `शिसवे` नावाचा ब्रॅंड तयार झाला. 

ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळच्या आपटी या जेमतेम हजार-दीड हजार लोकसंख्येच्या गावातून आलेल्या डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलीस प्रशासनात एक वेगळा अदार्श निर्माण केलाय. झाकीर हुसेन केस असो वा मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन. हे आंदोलन योग्यरित्या हाताळण्यात ज्या आधिकाऱ्यांचा महत्वाचा वाटा होता त्यात डॉ. शिसवे यांचे नाव आघाडीवर होते. मराठा मोर्चाच्या काळात राज्यात आणि मुंबईत वातावरण गंभीर होते. मात्र, या काळात मोर्चाचे नेते आणि प्रशासन यांच्यात ‘वन पाईंट कॉन्टॅक्ट’ म्हणून डॉ. शिसवेंची जबाबदारी महत्वाची होती.

सध्या पुण्याच्या पोलीस सहआयुक्तपदाची जबाबदारी

सध्या पुण्याच्या पोलीस सहआयुक्तपदाची जबाबदारी तितक्याच सक्षमेतेने सांभाळणारे डॉ. शिसवे चौथीपर्यंत गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकले. दहावीच्या बोर्ड परीक्षेत कळवा केंद्रात पहिले आले. बारावीनंतर ‘एमबीबीएस’ला बेळगावला मेरीटवर प्रवेश मिळविला. ‘एमबीबीएस’ पूर्ण करून शहापूर तालक्यातील (जि. ठाणे) डोळखांब या गावी प्राथमिक आरोग्य आधिकारी म्हणून रूजू झाले. या दरम्यान, त्यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाले. भावाचा झालेला मृत्यू हा माझ्यासाठी मोठा धक्का होता असे डॉ. शिसवे सांगतात. 

भावाच्या आठवणीने ते भावनाशील

भावाच्या आठवणीने ते भावनाशील होतात. ``अपघातात गेला तेव्हा माझ्याच वयाचा असलेला भाझा भाऊ माझा खरा मित्र होता. आम्ही दोघे नेहमी बरोबरच असायचो. त्याच्या मृत्यूनंतर त्याला अभिमान वाटेल असे काहीतरी करायचे असा निश्‍यय करून मी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासला सुरवात केली. मी ठाण्यात राहात होतो. त्यावेळी ठाणे महापालिकेने चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरू केली होती. अनेक विद्यार्थी या केंद्रात प्रवेश घेऊन ‘यूपीएससी’ तसेच ‘एमपीएससी’च्या परीक्षांचा अभ्यास करीत होते. या केंद्रात प्रवेश घेऊन मी अभ्यासाला सुरवात केली. पुढे मुंबईतल्या राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत (एसआयएसी) प्रवेश मिळाला. मनापासून अभ्यास केला. २००२ च्या ‘आयपीएस’च्या तुकडीत माझी निवड झाली. ‘आयपीएस’साठी निवड होणारा मी त्या बॅचचा महाराष्ट्रातला एकमेव आधिकारी होतो,`` असे शिसवे अभिमानाने सांगतात.

प्रोबेशनरी आधिकारी म्हणून​ पहिले पोस्टींग

"निवड झाल्यानंतर प्रोबेशनरी आधिकारी म्हणून माझे पहिले पोर्स्टींग सांगलीला झाले. त्यावेळी अशोक कामटे सांगलीचे एसपी होते. त्यांच्या हाताखाली माझे काम सुरू झाले. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, सिंधूदुर्ग, पुन्हा सांगली एसपी या जबाबदाऱ्या पार पाडत आलो. पुण्यात येण्याआधी मुंबईत परिमंडळ एकला तब्बल चार वर्षे काम केले. या साऱ्या प्रवासात अनेक चांगले अनुभव आले. प्रत्येक ठिकाणी काही वेगळे काम करता आले. प्रत्येकवेळी भावाची आठवण येतच राहते. त्याला अभिमान वाटेल असे काम करायचे असे ठरवलेले होतेच. त्यातूनच ‘आयपीएस’ झालो. केवळ भावनांच्या जोरावर मी इथपर्यंत पोचलो. भावनांना संवेदनशीलतेत परावर्तित केले," असे जेव्हा मनापासून सांगतात.

वाचनाचा छंद

खरे तर त्यांचे वाचन अफाट आहे. पोलिस अरसिक समजले जातात किंवा त्यांच्यामागे इतकी व्यवधाने असतात की त्यांना त्यांच्या छंदाला वेळ देणे अवघड होऊन बसते. पण या साऱ्या गडबडीतून शिसवे यांनी आपला वाचनाचा छंद जोपासला आहे. उर्दूचे वाचनही त्यांचे चांगले आहे. त्यांच्याशी संवाद साधताना ते सहजपणे शेर, कविता, उत्तम वाक्ये ऐकवतात. त्यातून सहज प्रेरणा देऊन जातात. सांगली, बुलढाणा अशा संवेदनशील ठिकाणी पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. पुण्यात कोरोनाच्या काळात पोलिसांसह नागरिकांनाही दिलासा मिळेल, असे निर्णय घेतले. त्यातून पोलिसांविषयीची चांगली प्रतिमा निर्माण झाली. अतिअभ्यासू किंवा प्रामाणिकपणाचा गंड असलेले अधिकारी त्यांच्यात अहंकाराचा दर्प आढळतो. त्यापासून शिसवे दूर आहेत. सिस्टिममध्ये आपण तेवढेच एक शहाणे आहोत, असा भाव मनात ठेवून काम करणाऱ्यांपैकी ते नाहीत. त्यामुळेच मग ते कोणाशीही सहजपणे संवाद साधू शकतात. त्यातूनच मग टीमवर्क उभे राहते. 

`नाही रे` वर्गातून `आहे रे` वर्गात येण्याची जिद्द

`नाही रे` वर्गातून `आहे रे` वर्गात येण्याची जिद्द होती. ती पूर्ण केली. मात्र, आता `आहे रे` वर्गात आल्यानंतर आवाज आणि बोलण्याची भाषा ही `नाही रे` वर्गासाठी वापरतो. आपण कुठून आलोय याची पूर्ण जाण आहे. त्यामुळे त्या वर्गाची भाषा आणि बांधिलकी सोडलेली नाही. सोडता येणे शक्ही नाही. जीवनातला आदर्शवाद जोपसण्याचा आटोकाठ प्रयत्न करतो. आपण प्रामाणिकपणे काम करून स्वत:ला प्रेरीत ठेवणे गरजेचे असते याची मला कायम जाणीव असते. नवं काही करून दाखविण्याचा उन्मेषवाद, पॅसिनेटिझम (धुंदीवाद) आजही माझ्यात कायम आहे. `ज्ञानेश्‍वरी` हा माझा वाचनाचा आणि आवडीचा विषय आहे. पुस्तके अनेक वाचतो. मात्र, ज्ञानेश्‍वरीचे वाचन मला प्रेरणा देणारे असते. ज्ञानेश्‍वरी हे गितेचे निरूपण आहे. स्वकर्म आणि स्वधर्माची गीतेतील शिकवण मी कायम आचरणात आणतो. आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करावे, हेच या साऱ्याचे सार आहे``, असे शिसवे सांगतात आणि त्यांच्या कृतीतून दे दाखवूनही देतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

पोलिस, स्पर्धा, पोलीस, प्रशासन, Administrations, स्पर्धा परीक्षा, competitive exam, प्रशिक्षण, Training, महाराष्ट्र, Maharashtra