महाडिकांच्या सूनबाईंनाच विजयासाठी झगडावे लागले  - Shaumika Mahadik won by just 40 votes in Gokul's election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

महाडिकांच्या सूनबाईंनाच विजयासाठी झगडावे लागले 

सुनील पाटील 
मंगळवार, 4 मे 2021

विजयासाठी शौमिका महाडिक यांना आठव्या फेरीपर्यंत वाट पाहवी लागली.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महाडिक घराण्यातील शौमिक महाडिक ह्या प्रथमच उतरल्या होत्या. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला असला ‘गोकुळ’मध्ये (Gokul Dudh) अनेक वर्षे वर्चस्व असलेल्या महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांच्या सूनबाईंनाच विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. त्यांना माजी आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांच्या पत्नी सुश्मिता पाटील यांनी कडवी झुंज दिली. त्यात शौमिका ह्या निसटत्या म्हणजे अवघ्या ४० मतांनी विजयी झाल्या. महाडिक घराण्याचे ‘गोकुळ’मधील अनेक वर्षांचे वर्चस्व पाहता हा विजय त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेसा असा नक्कीच म्हणता येणार नाही. (Shaumika Mahadik won by just 40 votes in Gokul's election)  

दरम्यान, शेवटपर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या ‘गोकुळ’च्या महिला गटातून विरोधी पाटील-मुश्रीफ गटाच्या अंजना केदारी रेडेकर, तर सत्तारूढ गटाच्या शौमिका अमल महाडिक ह्या विजयी झाल्या. यात शौमिका यांचा विजय निसटता ठरला आहे. 

कोल्हापूरसह राज्याला प्रतीक्षा लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीस आज (ता. ४ मे) सकाळी आठपासून सुरूवात झाली. त्यात प्रशासनाने अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे राखीव गटाची मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. महिला गटातील शौमिका महाडिक आणि सुश्मिता पाटील यांच्याकडील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.    
 
हेही वाचा : राखीव गटात महाडिकांना धक्का : सतेज पाटील गटाने जिंकल्या चार जागा 

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये सत्ताधारी गटाच्या पाटील-सरूडकर यांना 415, तर महाडिक यांना 410 मते मिळाली होती. विरोधी गटाच्या सुश्‍मिता पाटील यांना 420, तर रेडेकर यांना 463 मते मिळाली होती. विरोधातील पाटील-मुश्रीफ गट आघाडीवर राहिल्याने महाडिक गटाची धाकधूक वाढली होती. चौथ्या फेरीत सरूडकर यांना 881, तर महाडिक यांना 858 मते मिळाली, तर विरोधी गटाच्या पाटील यांना 843 व रेडेकर यांना 925 मते मिळाली. 

महाडिक यांच्या आघाडीने सत्ताधारी गटाला दिलासा मिळाला. त्यामुळे पुढच्या फेरीत कोण मताधिक्‍य अधिक घेणार, याकडे समर्थकांचे लक्ष लागले होते. मात्र, सातव्या फेरीत पुन्हा पाटील यांनी 1505 मते मिळवून आघाडी घेतली. महाडिक यांना या फेरीत 1483 मते मिळाली होती. तसेच, रेडेकर यांनी तब्बल 1660, तर पाटील-सरूडकर यांना 1453 मते मिळाली. या फेरीत रेडेकर यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने विरोधी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अखेरच्या फेरीत रेडेकर विजयी होताच विरोधी गटाच्या समर्थकांनी आनंद साजरा केला. त्याचबरोबर सत्ताधारी गटातून शौमिका महाडिक विजयी झाल्याने सत्ताधारी गटानेही जयघोष केला.

हेही वाचा : सर्वसाधारण गटातही मुश्रीफ-पाटील गटाचे 14 उमेदवार आघाडीवर; महाडिक गटाचे दोघे आघाडीवर

पण, या अटीतटीच्या लढतीत रेडेकर यांनी शेवटच्या फेरीतही मताधिक्‍य कायम राखत बाजी मारली. आठव्या फेरीत महाडिक यांनी लीड तोडून मुसंडी मारत विजयाला गवसणी घातली. अंजना रेडेकर यांना 1877, तर शौमिका महाडिक यांना 1764 मते मिळाली. सत्तारूढ गटातील अनुराधा पाटील-सरूडकर व विरोधी गटातील सुश्‍मिता राजेश पाटील पराभूत झाल्या. पाटील-सरूडकर यांना 1700  तर सुश्मिता पाटील यांना 1724 मते मिळाली. 

या प्रतिष्ठेच्या अटीतटीच्या लढतीत शौमिका महाडिक यांनी सुश्मिता पाटील यांचा पराभव केला असली तरी या विजयासाठी त्यांना झगडावे लागले आहे. आठव्या फेरीत लीड तोडून त्या अवघ्या ४० मतांनी विजयी झाल्या आहेत. म्हणजे विजयासाठी शौमिका महाडिक यांना आठव्या फेरीपर्यंत वाट पाहवी लागली. त्यामुळे  महाडिकांच्या प्रतिष्ठेला शोभणारा हा विजय म्हणता येणार नाही. 

दरम्यान, राखीव गटातून चार जण विजयी होताच विरोधी सतेज पाटील- हसन मुश्रीफ गटाने जल्लोष करण्यास सुरुवात केली. मात्र, ज्यावेळी शौमिका महाडिक ह्या आघाडी घेत विजयी झाल्या, त्यावेळी विरोधी गटातील उत्साहावर काहींशी निराशेची भावना दिसून येत होती. कारण, आगामी सर्वसाधारण गटाच्या मतमोजणीत हा ट्रेंड कायम राहिला तर काय, अशी चिंता त्यांना सतावत होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख