Gokul Election : सर्वसाधारण गटातही मुश्रीफ-पाटील गटाचे 14 उमेदवार आघाडीवर - Gokul Election: 14 candidates from Mushrif-Patil group lead in general category; Both of the Mahadik group are in the lead | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

Gokul Election : सर्वसाधारण गटातही मुश्रीफ-पाटील गटाचे 14 उमेदवार आघाडीवर

सुनील पाटील
मंगळवार, 4 मे 2021

तो महाडिक गटासाठी मोठा धक्का असणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत राखीव गटात चार जागा जिंकणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे सर्वसाधारण गटातील 16 पैकी 14 उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. सत्ताधारी महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या गटाचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत. हा कल असाच राहिल्यास तो महाडिक गटासाठी मोठा धक्का असणार आहे. (Gokul Election: 14 candidates from Mushrif-Patil group lead in general category) 

या पहिल्या फेरीमध्ये रणजित पाटील,  विश्वास पाटील, अभिजित तायशेटे, शशिकांत चुयेकर यांच्याबरोबरच चेतन नरके आणि अमरिश घाटगे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काही तासांत राखीव गटाची मतमोजणी पूर्ण झाली. त्यातील पाच जागांपैकी महाडिक आणि पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाला अवघी एक जागा मिळाली आहे. विरोधातील सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने चार जागा जिंकल्या आहेत. यात महाडिकांच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे घरातील शौमिका महाडिक या महिला गटातून विजयी झाल्या आहेत. 

हेही वाचा : राखीव गटात महाडिकांना धक्का : सतेज पाटील गटाने जिंकल्या चार जागा 

सर्वसाधारण गटात कांटे टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण, या गटात आमदार, मंत्री आणि त्यांचे वारस निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांच्या भवितव्याचा फैसला थोड्याच वेळेत होणार आहे. त्यामुळे त्याकडे कोल्हापूरबरेाबरच संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. 

अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी आठपासून सुरू झाली आहे. त्यात सुरुवातील राखीव गटातील मतमोजणी करण्यात आली आहे. या राखीव गटातील अनुसुचित जाती गटातून विरोधी म्हणजे पाटील-मुश्रीफ आघाडीचे उमेदवार माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे विजयी झाले आहेत. त्यांना ३४६ मते मिळाली आहेत. इतर मागासवर्गीय गटातून अमर पाटील यांनी बाजी मारली असून त्यांनी ४३१ मते घेतली आहेत. भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून बयाजी शेळके विजयी झाले आहेत. महिला गटातून अंजना रेडेकर या विजयी झाल्या आहेत. या चार जागा हसन मुश्रीफ-सतेज पाटील गटाने जिंकल्या आहेत.

दरम्यान, महाडिकांच्या घरातून ‘गोकुळ’च्या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या शौमिका महाडिक ह्या विजयी झाल्या आहेत. मात्र, त्यांना सुश्मिता राजेश पाटील यांच्याशी जोरदार टक्कर द्यावी लागली. महाडिक यांनी ४० मते अधिक घेत विजयश्री खेचून आणली. शौमिका महाडिक विजयी झाल्या असल्या तरी या निवडणुकीत सत्तारूढ गटातील विद्यमान संचालक विलास कांबळे, पी. डी. धुंदरे व विश्वास जाधव हे पराभूत झाले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख