झेडपी, पंचायत समितीत स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी भाजप लागला तयारीला

आगामी दोन्ही निवडणुकीत स्वबळावर लढून सत्ता काबीज करण्याची व्यूहरचना पक्षाच्या वतीनेसुरू केली आहे.
BJP begins preparations for local body elections
BJP begins preparations for local body elections

सोलापूर : भाजपची लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील कामगिरी जिल्ह्यात चांगली झाली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपने दिमाखदार विजय मिळविला, त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे पारडे जड होताना दिसत आहे. एवढे असूनही पक्षाने आता ‘समर्थ बुथ’ अभियानाचा नारा दिला जात आहे. या माध्यमातून गाव पातळीवरील बूथ यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाने ‘समर्थ’चा नारा दिला आहे. त्यातच राज्यस्तरीय नेतेमंडळींच्या फेऱ्याही जिल्ह्यात वाढल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केल्याचे मानले जात आहे. आगामी निवडणुकांबाबत भाजप किती गंभीर आहे, हे या सर्व घडामोडींवरून दिसून येते. (BJP begins preparations for local body elections)

सोलापूर जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून या बालेकिल्ल्याला हादरे बसत गेले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सहाजिकच त्यामुळे जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली. अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर या दोन मतदार संघापुरता मर्यादित असलेल्या भाजपने जिल्ह्यातील अनेक मतदार संघात सध्या वर्चस्व राखले आहे. माळशिरस, पंढरपूर-मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, बार्शी, अक्कलकोट या मतदार संघात सध्या भाजपचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीतही पक्षाने माढा व सोलापूर या दोन्ही जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केलेली माढा लोकसभेची जागा ही भाजपने राष्ट्रवादीकडून खेचून घेतली आहे.   


डिसेंबर-जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. सध्या या ठिकाणी भाजप बऱ्या प्रमाणात सत्तेत आहे. आगामी दोन्ही निवडणुकीत स्वबळावर लढून सत्ता काबीज करण्याची व्यूहरचना पक्षाच्या वतीने आतापासूनच सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी समर्थ बूथ यंत्रणेचा नारा भाजपने दिला आहे. त्यादृष्टीने प्रदेश पातळीवरील नेतेमंडळी जिल्ह्याला भेटी देऊन यंत्रणा सक्षम करण्याचे आवाहन करत आहेत. 

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगोल्यात आले होते. त्याचवेळी त्यांनी बार्शीचाही दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. राऊत यांच्या चिरंजीवांच्या लग्नाला येणे शक्य न झाल्याने फडणवीसांनी राऊतांच्या निवासस्थानी भेट देत ते नाराज होणार नाहीत, याची काळजी घेतली. 

पश्चिम महाराष्ट्रचे प्रभारी आशिष शेलार हे दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी सोलापूर शहर व ग्रामीणची स्वतंत्र बैठक घेतली. त्याचबरोबर प्रत्येक लोकप्रतिनिधींना बोलावून स्वतंत्रपणे त्यांची मते जाणून घेतली आहेत. प्रदेश पातळीवर सद्यस्थिती पोचविण्याचे काम शेलार यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही आगामी निवडणुकांवर चर्चा झाली. 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्र पॅनेल देणार? 

पुढील काही महिन्यांत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. ही निवडणूकही भाजपने गंभीरपणे घेण्याचा विचार सुरू केला आहे. त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील महिन्यात मुंबईमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार व लोकप्रतिनिधींची बैठक जिल्हा बँकेच्या विषयावर होणार आहे. बँकेची निवडणूक जरी आणखी दोन-तीन महिने पुढे असले तरी त्याची तयारी मात्र आतापासूनच पक्ष पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आपले स्वतंत्र पॅनेल देणार का याबाबतही जिल्ह्यात उत्सुकता लागून राहिली आहे. डिसेंबर महिन्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक यांना विजयी करण्यात भाजपची भूमिका महत्त्वाची ठरली होती. यंदाच्या निवडणुकीत नेमके काय होणार? पुन्हा ती जागा परिचारक यांनाच दिली जाणार का? याबाबतही उत्सुकता आहे.  

 बुथप्रमुखांना मार्गदर्शन

पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने बूथप्रमुख हा महत्त्वाचा दुवा आहे. त्या बूथप्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 सप्टेंबर रोजी संवाद साधणार आहेत. पक्षीय पातळीवर सुरू असलेल्या घटना, घडामोडींविषयी ते बूथप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील जवळपास 80 हजार बूथ प्रमुखांना पंतप्रधान मोदी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मार्गदर्शन करणार आहेत. त्यापूर्वी सगळी बूथयंत्रणा सक्षम करून ती पूर्ण केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com