आवताडेंचे वर्चस्व असलेल्या गटातच भाजपला दणका देण्याची राष्ट्रवादीची तयारी

माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नीचा तब्बल पाच हजारहून अधिक मताधिक्याने पराभव करुन त्या जाएंट किलर ठरल्या आहेत.
NCP has started preparations for the local body elections
NCP has started preparations for the local body elections

मंगळवेढा (जि. सोलापूर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्याने मंगळेवढा शहरात भारतीय जनता पक्षाने आंदोलनाच्या, तर तालुक्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसने संपर्क मोहिमेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांचे वर्चस्व असलेल्या हुलजंती गटातच भाजपला दणका देण्याची तयारी राष्ट्रवादीने चालवली आहे. त्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी लक्ष घातले आहे. (NCP has started preparations for the local body elections)
       
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत अति आत्मविश्वासामुळे पराभूत झालेली राष्ट्रवादी काँग्रेस आत्मचिंतन करून नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी करत आहे. मंगळवेढा शहरातील प्रश्नाबाबत गेल्या साडेचार वर्षांत कधीही आंदोलन न केलेल्या भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 12 विविध प्रश्नांवर आंदोलन करून आगामी निवडणुकांबाबत अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत.

गत नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झालेले नगरसेवक सध्या भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे होणारी निवडणूक सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी होणार आहे आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा गट कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहे. असे असले तरी या निवडणुकीत बबनराव आवताडे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीने पदाधिकारी निवडीत राजकीय समतोल साधल्याने निवडलेल्या पदाधिकाऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट संवाद दौरा सुरू केल आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीने हुलजंती जिल्हा परिषद गटातून जोरदार मोर्चेबांधणीला सुरू केलेली आहे. हा गट राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. सध्या आमदार समाधान आवताडे यांचे या गटात वर्चस्व आहे. ही बाब विचारात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मरवडे ग्रामपंचायतीचे गटनेते संजय पवार यांना जिल्हा सरचिटणीसपदी संधी देत हा गड सर करण्याची तयारी सुरु केली आहे.

हुलजंती जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व सध्या समाज कल्याण समितीच्या माजी सभापती शीला शिवशरण या करीत आहेत. माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नीचा तब्बल पाच हजारहून अधिक मताधिक्याने पराभव करुन त्या जाएंट किलर ठरल्या आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या योजना या गटात राबविण्याचा प्रयत्न केला आहे. याच गटातील त्यांचे सहकारी पंचायत समिती सदस्य प्रदीप खांडेकर यांना पहिल्या अडीच वर्षात, तर सध्या हुलजंती गणाच्या सदस्या प्रेरणा मासाळ यांनाही सभापतिपदाची संधी देऊन आवताडे गटाने या भागातील आपल्या सहकारी कार्यकर्त्यांना मोठ्या राजकीय जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. या तीनही पदाधिकाऱ्यांनी तत्परतेने कामेदेखील केली आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार आवताडे यांना या गटातून अत्यंत तोकड्या मताची आघाडी मिळाल्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भापत कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : पोकळ धमक्यांना घाबरत नाही ; राष्ट्रवादीनं भाजपला खडसावलं
     
हुलजंती गटामध्ये धनगर, मराठा, मागासवर्गीय व इतर अल्पसंख्याक समाजाची मते निर्णायक आहेत. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संजय पवार हे तालुकाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद भेटीच्या माध्यमातून गावोगावी जाऊन पक्षाची भूमिका व सरकारचे काम पोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या सोबतीला तळसंगी येथील उद्योजक हनुमंतराव दुधाळ यांच्या उपस्थितीची चर्चा होत आहे, त्यामुळे कदाचित दोघांपैकी एक जिल्हा परिषद उमेदवार असू शकतो, या दृष्टीने तयारी चालल्याचे बोलले जात आहे. 

आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक हे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढणार का, हे देखील बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आवताडे गटाकडून प्रदीप खांडेकर, बापू काकेकर, सुधाकर मासाळ यांची, तर परिचारक गटाकडून शिवानंद पाटील हे उमेदवारीसाठी दावेदार होऊ शकतात, त्यामुळे उमेदवार निवडीमध्ये एकमत घडविण्याचे मोठे आव्हान दोन्ही आमदारांपुढे असून याचा फायदा उठविण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी किती नेटाने प्रयत्न करतात, हेदेखील पाहावे लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com